नवी मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबईसह पनवेल विभागात विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी योग प्रशिक्षण शिबिरासोबत आरोग्य शिबिरांचेदेखील आयोजन करण्यात आले होते.
नेरूळ येथील तेरणा हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी मोफत योग प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात नेरूळ, सीवूड, जुईनगर आदी भागांतील महिला सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार आणि नूतन महिला बचतगटाच्या माध्यमातून अल्प दारात साखरवाटप करण्यात आले. नेरूळ सेक्टर २ मधील आम्रपाली असोसिएशन आणि डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कोपरखैरणे येथे आदित्य हेल्थ अॅण्ड एज्युकेशन सोसायटी व प्रतिभा इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त रॅली काढण्यात आली. तसेच महिलांवर होणारे अत्याचार, अॅसिडहल्ला, स्त्रीभ्रूणहत्या याबाबत पथनाट्य सादर करून समाजामध्ये महिलांवरील अत्याचाराविरोधात लढण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात महिलांनी व पुरु षांनी सहभाग घेतला होता.मोफत थायरॉईड तपासणी : जागतिक महिला दिनानिमित्त पनवेल येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या पुढाकाराने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल महापालिकेतील विरोधी पक्षनेते तथा जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून व नवीन पनवेल येथील दीपक क्लिनिक लॅबोरेटरीजच्या सहयोगाने आयोेजित करण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धकाधकीच्या जीवनामध्ये कुटुंबांमधील सर्व जबाबदारी पार पाडत असताना महिलांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. विशेषत: थायरॉईडसारखे विकार जडतात. ही बाब लक्षात घेऊन महिला दिनाचे औचित्य साधून या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात शिबिरार्थी महिलांची मोफत थायरॉईड चाचणी करण्यात आली. या शिबिरात सहभागी महिलांना तुळशीचे रोपटे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी नगरसेविका प्रीती जॉर्ज (म्हात्रे), नगरसेविका सारिका भगत, माधुरी गोसावी, कविता ठाकूर, विद्या चव्हाण, शेकाप युवानेते जॉनी जॉर्ज, मंगेश अपराज, दीपक क्लिनिक लॅबोरेटरीजचे संचालक दीपक कुदळे, हेमा कुदळे, मुस्कान कुदळे, अंकिता माने, रितेश ठक्कर आदी उपस्थित होते.मोफत रिक्षा सेवा : धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान पनवेलतर्फे महिला दिनानिमित्त महिलांसाठी पनवेल शहरात मोफत रिक्षा सेवा ठेवण्यात आली होती. त्याला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. महिलांना मोफत प्रवास ही वेगळी संकल्पना मांडल्याने महिलांनी या उपक्रमाचे स्वागत केले. या वेळी पोलीस उपनिरीक्षक सरिता मुसळे, वाहतूक पोलीस बी.एम. साळवी, सीमा मानकामे, संगीता सरकाळे आदी उपस्थित होते. शहरातील मिरची गल्ली नाका, विसावा हॉटेल नाका, बस स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, सोसायटी नाका या ठिकाणी महिलांना प्रवास करण्यासाठी मोफत रिक्षाची व्यवस्था करण्यात आली होती.