पनवेल : एनएमएमटीच्या दुसऱ्या बससेवेचा प्रारंभ शुक्रवारी झाला असून पनवेल रेल्वे स्थानक ते करंजाडे वसाहतीदरम्यान ही बस धावणार आहे. या प्रवासात एकूण १४ बसथांबे आहेत. पनवेलमधील शिवाजी चौकातून या बससेवेला प्रारंभ झाला. कफ संस्थेने केलेल्या पाठपुराव्यानंतर पनवेलकरांना पनवेल रेल्वे स्थानक ते साईनगर अशा पहिल्या टप्प्यातील बससेवेचा लाभ मिळाल्यावर शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील बससेवेला सुरु वात झाली. करंजाडे परिसर हा नव्याने विकसित होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ही वसाहत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात नवीन इमारतींचे बांधकाम सुरू आहे. स्थानिक रहिवाशांनाही रिक्षाशिवाय वाहतुकीचा पर्याय उपलब्ध नव्हता त्यामुळे नव्याने सुरु झालेल्या या बससेवेचा स्थानिकांना मोठा लाभ होणार आहे. बससेवेच्या उद्घाटनप्रसंगी पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे, कफचे अध्यक्ष अरु ण भिसे तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)दर १८ मिनिटाला पनवेल रेल्वेस्थानक ते करंजाडे अशी बस धावणार आहे. रेल्वे स्थानकातून सकाळी ६.४५ वा. बस सुटेल तर करंजाडेवरून सकाळी ७ वा. पहिली बस धावेल. बस डेपो, भाजी मार्केट, शिवाजी चौक, एमटीएनएल रोड, एसबीआय, पंचरत्न सर्कल, रायगड बाजार, टपाल नाका, करंजाडे फाटा, एससी कॉलेज फाटा, करंजाडे सेक्टर 3, करंजाडे गाव असा हा मार्ग असणार आहे.
पनवेल - करंजाडे एनएमएमटी सुरु
By admin | Published: April 16, 2016 1:21 AM