महापालिकेसाठी पनवेलकर उत्सुक
By admin | Published: May 2, 2016 02:18 AM2016-05-02T02:18:30+5:302016-05-02T02:18:30+5:30
पनवेल महापालिकेला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कळंबोली, कामोठे तसेच पनवेल परिसरातील सामाजिक संस्था, प्रतिष्ठित नागरिकांनी प्रस्तावित महापालिकेचे
- प्रशांत शेडगे, पनवेल
पनवेल महापालिकेला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कळंबोली, कामोठे तसेच पनवेल परिसरातील सामाजिक संस्था, प्रतिष्ठित नागरिकांनी प्रस्तावित महापालिकेचे स्वागत केले आहे. त्यामुळे शहराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास रहिवाशांनी व्यक्त केला आहे.
पनवेल शहर पनवेल नगरपालिकेच्या अधिपत्याखाली आहे. दीडशे वर्षे जुनी नगरपालिका असली तरी विकासाकरिता अनेक अडचणी येत आहेत. नवीन पनवेलबरोबर कळंबोली, कामोठे, खारघर वसाहत सिडकोने विकसित केली. यात खासगी इमारतींचा सुध्दा समावेश आहे. आजच्या घडीला लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कळंबोली वसाहत ही साडेतीन मीटर खाली आहे. त्याचबरोबर येथे अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे. पाणी, रस्ते, कचरा, सांडपाण्याची अवस्था अतिशय बिकट आहे. अनेक नागरी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे कळंबोलीकर सिडकोवर कमालीचे नाराज आहेत. सिडकोला पर्याय म्हणून महापालिकेकडे स्थानिक रहिवासी पहात आहेत. महापालिका झाली तर कचरा वेळच्या वेळी उचलला जाईल. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असा विश्वास स्थानिक रहिवासी वंदना बामणे यांनी व्यक्त केला आहे. तेच प्रश्न, तीच आश्वासने यामुळे आम्ही हैराण झालो आहेत. सिडको फक्त नावापुरती आहे, विकास काहीच नाही, त्याकरिता महापालिका झालीच पाहिजे असे मत येथील नागरिक विष्णू धुरी यांनी व्यक्त केले आहे. या परिसरात डासांचे तर सांगूच नका, मलेरिया व डेंग्यू फ्री असल्याची खोचक टीका बालाजी घुमे यांनी केली.
यावर रामबाण उपाय म्हणजे महापालिकाच असे स्पष्ट मत घुमे यांनी लोकमतकडे व्यक्त केले आहे. कामोठे वसाहतीतील रहिवासी सुध्दा पनवेल महापालिकेबाबत सकारात्मक आहेत. येथील रहिवाशांकडून अधिक पसंती मिळत आहे. नवीन पनवेल आणि खांदा वसाहतीत सुध्दा पनवेल महानगरपालिका व्हावी याकरिता सकारात्मक आहेत.
अलर्ट सिटिझन फोरम, मॉर्निंग योगा ग्रुपचे संजय भोपी यांनी पनवेल महापालिका झाली तर खांदा वसाहतीचा नक्की विकास होईल. त्याचबरोबर सिडकोला चांगला पर्याय मिळेल, असे सांगितले.