रायन इंटरनॅशनल शाळेवर पालकांची धडक, दिल्लीतील घटनेचे पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 07:12 AM2017-09-13T07:12:42+5:302017-09-13T07:12:42+5:30
दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल शाळेवर पालकांनी धडक दिली. मागणी करूनही शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याचा पालकांचा आरोप आहे. यानुसार शाळा व्यवस्थापनासोबत झालेल्या बैठकीत पालकांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवदेन देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर भर देण्याची मागणी केली.
नवी मुंबई : दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल शाळेवर पालकांनी धडक दिली. मागणी करूनही शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याचा पालकांचा आरोप आहे. यानुसार शाळा व्यवस्थापनासोबत झालेल्या बैठकीत पालकांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवदेन देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर भर देण्याची मागणी केली.
दिल्लीतील रायन इंटरनॅशनल शाळा व्यवस्थापनाच्या हलगर्जीमुळे एका मुलाचा मृत्यू झाला आहे. अशीच घटना इतर शाळांमध्येही घडू शकते, अशी शक्यता पालकांकडून वर्तवली जात आहे. त्यानुसार सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल शाळेबाहेर पालकांनी मोठ्या संख्येने जमाव जमवून व्यवस्थापनाला धारेवर धरले. शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत निष्काळजीपणा होत असल्याचा पालकांचा आरोप आहे. यासंबंधी पालकांनी अनेकदा व्यवस्थापनाकडे मागणीही केलेली आहे. शाळेत सीसीटीव्ही बसवावेत, विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया बसचे चालक प्रशिक्षित असावे, बस पार्किंगची व्यवस्था असावी, अशा पालकांच्या प्रमुख मागण्या आहेत. मात्र, शाळेतील सीसीटीव्ही अनेक महिन्यांपासून बंद स्थितीत असून, ते सुरू करण्याची मागणी करणाºया पालकांवर व्यवस्थापनाकडून दडपण आणले जात असल्याचाही पालकांचा आरोप आहे.
अखेर दिल्लीतल्या घटनेनंतर चिंतित झालेल्या पालकांनी मंगळवारी सकाळी शाळेबाहेर मोठ्या संख्येने जमाव जमवला होता. यादरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता सानपाडा पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता.
या वेळी पालकांनी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी बाहेर येऊन चर्चा करावी, अशी मागणी केली; परंतु जमलेली गर्दी पालकांची नसून राजकीय कार्यकर्त्यांची असल्याचा आरोप करत त्यांची भेट घेण्याचे मुख्याध्यापकांनी टाळले. यामुळे जमाव अधिक संतप्त झाल्याने वरिष्ठ निरीक्षक सूरज पाडवी यांच्या मध्यस्थीनंतर मुख्याध्यापकांनी पालकांसोबत
चर्चा केली. या वेळी शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत शाळेत असलेल्या त्रुटींमध्ये सुधार करण्याचे आश्वासन दिले.
पालकांनी मागणी करूनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत शाळा व्यवस्थापन हलगर्जीपणा करत आहे. यामुळे दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर संतप्त पालकांनी शाळेवर धडक दिली. या वेळी पालकांनी दिलेल्या निवेदनातील मुद्द्यांनुसार शाळेत सुधार केला जाईल, असे आश्वासन मुख्याध्यापकांनी दिल्याचे पालक प्रतिनिधी मिलिंद सूर्याराव यांनी सांगितले.