पनवेलसाठी पाताळगंगाचे वाढीव पाणी
By admin | Published: April 19, 2016 02:33 AM2016-04-19T02:33:07+5:302016-04-19T02:35:46+5:30
शहरातील एमजेपीच्या जलवाहिन्या जुनाट झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणीगळती होते. मात्र आता दुरुस्तीऐवजी या जुनाट जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय एमजेपीने घेतला आहे.
प्रशांत शेडगे, पनवेल
शहरातील एमजेपीच्या जलवाहिन्या जुनाट झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणीगळती होते. मात्र आता दुरुस्तीऐवजी या जुनाट जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय एमजेपीने घेतला आहे. त्याचबरोबर प्राधिकरणाला पाताळगंगा नदीतून आणखी वाढीव पाणी उचलता येणार आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभागाबरोबर करारही झाला आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील पाणीटंचाई कमी होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाताळगंगा नदीपात्रातून घेण्यात येणारे पाणी भोकरपाडा येथील जलशुध्दीकरणकेंद्रात शुध्द करण्यात येते. त्या ठिकाणाहून जलवाहिनीतून ते पनवेल नगरपालिका, जेएनपीटी, सिडको वसाहती आणि आजूबाजूच्या गावांना पुरवले जाते. या वाहिन्या जुनाट व जीर्ण झाल्याने त्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. त्यातून दररोज हजारो लीटर पाणी वाया जाते. त्यामुळे या जीर्ण वाहिन्या बदलण्याचा प्रस्ताव एमजेपीकडे आहे.
जलवाहिन्या बदलण्यासाठी पनवेल नगरपालिका ३० कोटींचा आर्थिक हातभार लावणार आहे. बदल्यात प्राधिकरणाकडून पनवेल शहराकरिता २० एमएलडी पाणी आरक्षित ठेवणार आहे. अमृत योजनेंतर्गत पालिकेला मिळणाऱ्या निधीतून हे पैसे वर्ग करण्यात येणार आहेत. अर्थसंकल्पामध्ये सुध्दा प्रशासनाने तरतूद केली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलवाहिन्या बदलण्याकरिता १९६ कोटींचा आराखडा तयार केला आहे. याकरिता सिडको १४४, जेएनपीटीचा ४६ कोटींचा आर्थिक सहभाग असेल. यासंदर्भात करारनामा सुध्दा झाला असून हा करारनामा प्राधिकरणाने सिडकोला सादर केला आहे. मात्र काही तांत्रिक त्रुटी असून त्या सुधारण्याचेप्रयत्न एमजेपी करीत आहे.
लवकरच करारनामा पूर्ण होऊन सिडकोकडून पैसे वर्ग केले जाणार असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. तीनही यंत्रणा सकारात्मक असल्याने एमजेपीच्या नूतन पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. एमजेपीच्या जुनाट वाहिन्यांना फुटीचे ग्रहण लागल्याने वारंवार शटडाऊन घ्यावा लागतो. नवीन वाहिन्यामुळे शटडाऊनची गरज भासणार नाही, त्यामुळे नियमित पाणीपुरवठा होईल.