एपीएमसीवर शेकाप आघाडीचा झेंडा
By Admin | Published: November 15, 2016 04:52 AM2016-11-15T04:52:51+5:302016-11-15T04:52:51+5:30
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीने विजय मिळवला आहे. निवडणुकीत १७ च्या १७ जागांवर आघाडीचे
मयूर तांबडे / पनवेल
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीने विजय मिळवला आहे. निवडणुकीत १७ च्या १७ जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी झाले असून भाजपाला एकाही जागेवर विजय मिळविता आलेला नाही. आघाडीचे उमेदवार निवडून आल्यावर जल्लोष करण्यात आला. यावेळी आतषबाजी करताना शेकाप आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडले. या हाणामारीत एक जण जखमी झाला आहे. त्यामुळे काही काळ याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवारी पार पडली. ग्रामपंचायत विभागातील ४, व्यापारी/अडते यांच्यामधून २ आणि हमाल/मापाडी यांच्यामधून १ अशा ७ उमेदवारांच्या निवडीसाठी सरस्वती विद्यामंदिर येथे मतदान घेण्यात आले. शेकाप आघाडी व भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
दहा जागांवर शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित ७ जागांसाठी १६२४ मतदारांपैकी १४६९ मतदारांनी मतदान केले. या ७ जागांचा निकाल सोमवारी सकाळी १० वाजता सरस्वती विद्यामंदिर या शाळेमध्ये लागला. यात कोणता पक्ष बाजी मारतोय, हे पहाण्यासाठी नागरिकांनी शिवाजी सर्कल येथे मोठी गर्दी केली होती. यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. ७ पैकी ७ जागांवर शेकाप आघाडीने बाजी मारत भाजपाचा धुव्वा उडवला.
निवडणूक अधिकारी चेतन चौधरी यांनी निकाल घोषित करताच शेकाप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यामध्ये शेकापने एकूण १५ जागा, काँग्रेस १ तर शिवसेनेने १ जागेवर विजय मिळवला.
ग्रामपंचायत विभागातून सुनील दुकल्या सोनावळे (४९५ मते), राजेंद्र महादेव पाटील (४८३), प्रकाश पाटील (४७०), रुपेश प्रकाश पाटील (५०५) हे विजयी झाले. तर हमाल/मापाडी यांच्यामधून हरिश्चंद्र कारभारी म्हस्के (७० मते) मिळवून विजयी झाले. व्यापारी /अडते यांच्यामधून रमाकांत हशा गरु डे (४६५ मते), आणि सुरेश नारायण भोईर (३९७ मते) हे विजयी झाले. तर संतोष पाटील, सुरेश नाईक, रमाकांत दाभने, दत्तात्रेय पाटील, मोहन कडू, महादू गायकर, राम भोईर, संतोष के.पाटील, मेघा म्हसकर, प्रज्योती म्हात्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मोदी सरकारच्या नोटाबंदीचा फटका भाजपाला या निवडणुकीत बसल्याची चर्चा पनवेलमध्ये आहे.