नवी मुंबई : एपीएमसी येथे फेरीवाले हटविण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या तसेच पोलिसांच्या पथकावर दगडफेक झाल्याची घटना घडली. तसेच फेरीवाल्यांनी महिला पोलिसांनाही मारहाण करून कारवाईला विरोध दर्शवला.
शहरात अनधिकृत फेरीवाल्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. बहुतांश ठिकाणचे रहदारीचे मार्ग फेरीवाल्यांनी अडविले आहेत. अशाच प्रकारे एपीएमसी येथील वाहतूक पोलीस चौकी ते मसाला मार्के टच्या प्रवेशद्वारापर्यंतचा सर्व्हिस रोड पूर्णपणे फेरीवाल्यांनी व्यापला आहे. या पूर्वीही त्यांच्यावर अनेकदा कारवाया झाल्या आहेत. त्यानंतरही ते हटत नसल्याने गुरुवारी संध्याकाळी या ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई सुरू होती. कारवाईसाठी गेलेल्या महापालिका व पोलीस पथकावर फेरीवाल्या महिलांनी तुफान दगडफेक केली. यामुळे पोलिसांनी महिलांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता महिला पोलिसांनाच मारहाण करण्यात आली. या प्रकरणी ऊर्मिला रोहनकर यांच्या तक्रारीनुसार अतिक्र मण कारवाईमध्ये अडथळा आणल्याप्रकरणी व पोलिसांवरही हल्ला केल्याप्रकरणी रेणुका देहावत, लता राठोड, सोनी राठोड विरोधात गुन्हा दाखल केला आहे.