आरोपीच्या अटकेसाठी पोलीस बनले वेटर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 02:54 AM2020-11-28T02:54:19+5:302020-11-28T02:55:30+5:30
बंगळुरूच्या हॉटेलमध्ये थरारनाट्य
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : भाड्याने घेतलेल्या गाड्या परराज्यात विकणाऱ्या टोळीच्या सूत्रधाराला अटक करण्यासाठी पोलिसांना वेटरची भूमिका करावी लागली. तीन दिवस वेटर बनून पाळत ठेवल्यानंतर तो नवी मुंबई पोलिसांच्या हाती लागला आहे.
अँथोनी पॉलच्या टोळीने अंधेरी येथे नवे कार्यालय सुरू करून भाड्याने देण्यासाठी गाड्या घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार लक्ष्मण कोपरकर यांनी तिथे पाळत ठेवली. या वेळी सत्यप्रकाश वर्मा उर्फ बाबू हा भोईसर येथे राहत असल्याची माहिती समोर आली. परंतु तो कधीतरीच त्या ठिकाणी येत असल्याने त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्याच्याच शेजारची खोली पोलिसांनी भाड्याने घेतली. या वेळी सहायक निरीक्षक राजेश गज्जल, लक्ष्मण कोपरकर, ऊर्मिला बोराडे व राहुल वाघ हे त्या ठिकाणी ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान त्या ठिकाणी तळ ठोकून होते. अखेर ५ तारखेला तो पत्नीला भेटायला आला असता पोलिसांच्या हाती लागला. त्याला ताब्यात घेतले असता चौकशीत मुख्य सूत्रधार अँथोनी पॉल याच्याविषयी माहिती मिळाली. परंतु पॉल हा दुबईचे मोबाइल सिम वापरून सर्वांना चकमा देत होता. अखेर तो बंगळुरू येथे एका हॉटेलमध्ये राहत असल्याचे समजले. यानुसार गज्जल हे संजय पवार व राहुल वाघ यांच्यासह त्याच दिवशी बंगळुरूला गेले. गज्जल व वाघ हे त्या ठिकाणी तीन दिवस वेटर म्हणून वावरू लागले. अखेर तीन दिवसांनी पॉल हा खोलीत आला असता गज्जल यांनी वेटर बनून खोलीत जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या.
३०० हून अधिक गाड्या विकल्याची शक्यता
पोलिसांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीद्वारे गुन्हे शाखा पोलिसांनी तत्काळ गुजरात येथे ठिकठिकाणी छापे मारून विकलेल्या चोरीच्या २० गाड्या जप्त केल्या. या टोळीने राज्यभरातून ३०० हून अधिक गाड्या चोरून गुजरात व इतर राज्यांत विकल्याची शक्यता आहे. त्याच्या अटकेसाठी गुन्हे शाखेचे पथक सलग २५ दिवस कार्यरत होते.
सूत्रधाराला पहिल्यांदाच अटक
गाड्या घेऊन त्यांची चोरी करणाऱ्या टोळीला सूत्रधारासह पोलिसांनी अटक केली आहे. टोळीचा सूत्रधार अँथोनी पॉल हा पहिल्यांदाच अटक झाला असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांना वेटर बनून हॉटेलमध्ये राहावे लागले.