नवी मुंबई : नवी मुंबई शहरात पोलिसांच्या निवाऱ्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शहरातील अनेक पदपथ आणि रस्त्याच्या कडेला पोलीस चौक्या उभारण्यात आलेल्या आहेत. वापर होत नसल्याने यामधील अनेक पोलीस चौक्या बंद असून, यामुळे पदपथ व्यापले गेले आहेत. बंद असलेल्या चौक्यांमुळे नागरिकांना पदपथावरून चालताना अडथळा निर्माण होत असून याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
दिवस-रात्र नागरिकांची सेवा करीत ऊन, पावसाळ्यात कर्तव्य पार पाडणाºया पोलिसांना परिसरातील लहान घटनांवर लक्ष ठेवता यावे, यादृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून नगरसेवक निधीतून पोलीस चौकी बनवून देण्यात आल्या आहेत. महापालिकेने या चौक्या काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला तर काही ठिकाणी पदपथावर ठेवल्या आहेत. यातील बºयाच चौकी वापरात नसून धूळखात पडलेल्या आहेत. तर पदपथावर असलेल्या चौक्यांमुळे नागरिकांना पदपथावरून चालताना अडचण निर्माण होत आहे. नेरुळमधील काही चौक्यांचा वापर पोलीस करीत असून, अनेक चौक्या बनविल्यापासून त्यांचा वापरच झाला नसल्याने या चौक्यांची दुरवस्था झाली आहे. परिसरालाही बकाल रूप प्राप्त झाले आहे. तसेच पदपथावर विद्युत डीपी आणि एमटीएनएलच्या डीपीदेखील मोठ्या प्रमाणावर असल्याने सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. या चौक्या आवश्यक ठिकाणी हलविण्यात याव्यात, नागरिकांना ये-जा करण्यासाठी पदपथ रिकामे करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.