अश्विनी बिद्रे प्रकरणातील आरोपींना 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 04:14 PM2017-12-15T16:14:41+5:302017-12-15T16:15:09+5:30
नवी मुंबई- अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकर आणि राजू पाटील यांना 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नवी मुंबई- अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकर आणि राजू पाटील यांना 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पनवेल न्यायालयात आज सुनावणी झाली आहे. न्यायालयानं दोन्ही आरोपींना 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पनवेल पोलिसांनी डीएनए चाचणीसाठी अश्विनीच्या मुलीच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत.
या प्रकरणात जळगावमधल्या ज्ञानदेव दत्तात्रेय पाटील ऊर्फ राजू पाटील याला कळंबोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. गेल्या सुनावणीत न्यायालयानं राजू पाटीलला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. 364, 323, 497, 506 (2) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानदेव ऊर्फ राजू पाटील हा एकनाथ खडसे यांचा भाचा असल्याची माहिती समोर आली होती. अश्विनी बिद्रे यांच्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत असताना यातील नेमके धागेदोरे शोधण्यासाठी पोलिसांना मोठे आव्हान उभे असताना ज्ञानदेव पाटीलसारखा आरोपी ताब्यात घेण्यात पोलिसांना मोठे यश आलं होतं.
अश्विनी बिद्रे प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्या मोबाईल संभाषणाचे रेकॉर्ड पोलिसांना प्राप्त झालेलं असून, या अनुषंगाने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी अश्विनी बिद्रे या बेपत्ता झाल्या व त्यांचे शेवटचे असलेले लोकेशनवरून त्यावेळी अभय कुरुंदकरने ज्ञानदेव पाटीलशी संपर्क केल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात सांगलीतील कुपवाड परिसरातील एक माजी नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अटकेतील पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्या संपर्कात तो होता, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांच्या चौकशीतून पुढे आली आहे. दरम्यान, सांगली व कुपवाडच्या चार व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी यासंदर्भात चौकशीसाठी बोलाविले आहे.