उपेक्षित मुलांसाठी पोलीस ‘आशाकिरण’
By admin | Published: April 17, 2016 01:08 AM2016-04-17T01:08:36+5:302016-04-17T01:08:36+5:30
बेघर उपेक्षित मुलांसाठी नेरूळ पोलीस ठाण्यात सुरू असलेल्या आशाकिरण संस्थेच्या शाळेमुळे अनेक मुलांच्या शिक्षणाची कवाडे उघडी झाली आहेत. काहींनी तर याच शाळेच्या माध्यमातून
नवी मुंबई : बेघर उपेक्षित मुलांसाठी नेरूळ पोलीस ठाण्यात सुरू असलेल्या आशाकिरण संस्थेच्या शाळेमुळे अनेक मुलांच्या शिक्षणाची कवाडे उघडी झाली आहेत. काहींनी तर याच शाळेच्या माध्यमातून गतवर्षी दहावीदेखील प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण केलेली आहे. या शाळेचा वर्धापन दिन शनिवारी पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
ज्यांचे पालक आहेत त्यांना शिक्षणाची दारे उघडणाऱ्या अनेक संस्था आहेत. परंतु ज्यांना पालकच नाहीत किंवा असूनही कुटुंबच रस्त्यावर आहे, अशा मुलांसाठी किंचितच कोणी पुढाकार घेते. त्यापैकीच एक नेरूळमधील आशाकिरण संस्था आहे. वनी प्रसाद, अपर्णा राव, नीतू महातो, शेरीन सुकेश, देवांजली होट्टा व मौसमी महापत्रा यांनी त्याकरिता विशेष पुढाकार घेतलेला आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी त्यांनी बेघर अथवा अत्यंत गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी आशाकिरण संस्थेच्या माध्यमातुन शाळेला सुरुवात केली. प्रथम काही वर्षे मिळेल त्या जागेत यांची शाळा भरायची. या काळात त्यांना अनेकांनी शाळा भरवण्यासाठी काही महिने जागा उपलब्ध करून दिली. मात्र सर्वच ठिकाणे काही महिन्यांपुरती असल्याने त्यानंतर पुन्हा जागेचा प्रश्न त्यांना उद्भवत होता. यादरम्यान २०१४ साली पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता अल्फान्सो यांनी त्या संस्थेला मदतीचा हात दिला. तेव्हापासून नेरूळ पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर उपलब्ध जागेत ही शाळा भरत आहे. यामुळे रस्त्यावरील जी मुले गुन्हेगारी कृत्यामुळे पोलीस ठाण्यात येण्याची शक्यता होती, ती आज अक्षरे गिरवण्यासाठी पोलीस ठाण्याची पायरी चढत आहेत.
सध्या शाळेत शिकत असलेल्या अनेक मुलांना तंबाखूसह इतर व्यसनांची बालपणातच सवय लागली होती. यामुळे भविष्यात त्यांना गुन्हेगारीचे देखील वळण लागण्याची शक्यता होती. परंतु आशाकिरणच्या माध्यमातून पोलिसांनी शिक्षणाची कवाडे उघडी केल्यामुळे त्यांचे भविष्य उजळ झाले आहे. सध्या या शाळेत ७० मुले शिकत असून, त्यांना शिकवण्यासाठी परिसरातील २५ महिला समाजसेवेच्या भावनेतून त्यांना शिकवत आहेत. गतवर्षी १० मुलांनी दहावीची परीक्षा दिली असता त्यापैकी ९ विद्यार्थी प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत. त्यानुसार नेरूळ पोलीस ठाण्यात सुरू केलेल्या या शाळेचा द्वितीय वर्धापन दिन नेरूळच्या आश्रय सभागृहात झाला. याप्रसंगी पोलीस आयुक्त प्रभात रंजन, उपायुक्त सुरेश मेंगडे, साहाय्यक आयुक्त धनराज दायमा, वरिष्ठ निरीक्षक संगीता अल्फान्सो आदी उपस्थित होते.