पाच दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:26 AM2019-04-12T00:26:40+5:302019-04-12T00:26:44+5:30
रबाळेमध्ये कोयता हस्तगत : हद्दपार केलेल्या दोघांना अटक
नवी मुंबई : तुर्भे व रबाळे परिसरामधील पाच दारू अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून मद्यसाठा जप्त केला. रबाळेमध्ये कोयता जप्त केला आहे. शहरातून हद्दपार केलेल्या दोघांनाही अटक केली आहे.
लोकसभा निवडणुका शांततेमध्ये पार पाडण्यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. शहरात रोज कोम्बिंग आॅपरेशन केले जात आहे. अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर छापे टाकले जात आहेत. संभाजीनगर झोपडपट्टीमध्ये बुधवारी छापा टाकून देशी दारूच्या ७३ बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी ललिता परब या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐरोली गावाजवळील झोपडपट्टीमधून देशी दारूच्या २० बाटल्या जप्त केल्या असून सदानंद शर्माविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तुर्भे पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये महात्मा गांधी नगरमध्येही बुधवारी छापा टाकून ७ देशी दारूच्या बाटल्या ताब्यात घेतल्या. याप्रकरणी धर्मेंद्र सरोजविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याच परिसरामध्ये रामराज सरोज या व्यक्तीलाही ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १० देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. इंदिरानगरमधील गणपतीपाडा वसाहतीमध्ये छापा टाकून देशी दारूच्या २४ बाटल्या जप्त केल्या आहेत. दारू विक्री करणाºया बाळू मोरेविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. घणसोली परिसरामध्ये तपासणी करत असताना ए. आर. मेदरू या तरुणाकडे कोयता आढळून आला आहे. मनाई आदेशाचा भंग करून स्वत:जवळ शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरोधात रबाळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या अनेकांना पोलिसांनी दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार केले आहे; परंतु हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून अनेक जण नवी मुंबईमध्येच वास्तव्य करत असून त्यांच्यावरही कारवाईचा धडाका सुरू केला आहे. तुर्भे स्टोअर परिसरामधून अंबिका किशन राठोड याला बुधवारी सकाळी अटक केली आहे. याच परिसरातून बी. एस. मस्केवरा या तरुणालाही अटक केली आहे. या दोघांनाही दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते; परंतु मनाई आदेशाचे उल्लंघन करून ते या परिसरामध्ये वास्तव्य करत असल्याने त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
सर्वात मोठी कारवाई
आचारसंहिता सुरू झाल्यापासून सर्वात मोठी कारवाई बुधवारी करण्यात आली. एकाच दिवशी पाच ठिकाणी दारू विक्री करणाºयांवर छापे टाकण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. शस्त्र बाळगणारा एक व हद्दपार केलेल्या दोघांना अटक केली आहे. या कारवाईमुळे अवैधपणे व्यवसाय करणाºयांचे धाबे दणाणले आहे.
पनवेलमध्येही कारवाई
परिमंडळ एकमध्ये दारू विक्रेते व अवैध व्यवसाय करणाºयांवर छापे टाकले जात आहेत. रबाळेमध्ये अमली पदार्थ विक्री करणाºया विदेशी नागरिकांवरही कारवाई केली आहे. परिमंडळ दोनमधील पनवेल परिसरामध्येही पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे. आतापर्यंत दोन किलो चरस, चार किलो गांजा व अनेक मद्यविक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याचा धडाका सुरू केला आहे.