महिलांसाठीच्या योजना कागदावरच, पोलिसांचे सावली केंद्र बंदच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 12:24 AM2019-03-08T00:24:49+5:302019-03-08T00:25:12+5:30
शासकीय व निमशासकीय कार्यालयांसह शहरामध्ये महिलांसाठीच्या अनेक योजना कागदावरच असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
नवी मुंबई : शासकीय व निमशासकीय कार्यालयांसह शहरामध्ये महिलांसाठीच्या अनेक योजना कागदावरच असल्याचे चित्र दिसू लागले आहे. पोलिसांचे नेरुळमधील सावली हे महिला आधारकेंद्रही बंदच आहे. अनेक ठिकाणी महिला विश्रांतीकक्ष फक्त नावापुरतेच असल्याचे निदर्शनास आले आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये महिला आधारकेंद्र सुरू करण्यासाठी सिडकोने नेरुळमध्ये भूखंड उपलब्ध करून दिला आहे. २००३ मध्ये तत्कालीन पोलीस महासंचालक सुभाष मल्होत्रा यांच्या हस्ते या केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. यानंतर एप्रिल २००३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते कोनशीला समारंभ करून, इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. या इमारतीमध्ये महिला पोलीस कल्याण केंद्र सुरू करण्यात आले होते; परंतु हे केंद्र अनेक महिन्यांपासून बंद आहे. महिलांसाठी उभारलेल्या इमारतीचा काहीही उपयोग केला जात नाही. विद्यमान आयुक्त संजय कुमार यांनी इमारतीची व परिसराची साफसफाई करून घेतली. दिवसभर बंदोबस्तासाठी एक कर्मचारीही नियुक्त केला आहे; पण अद्याप या इमारतीचा वापर केला जात नाही. सद्यस्थितीमध्ये एनआरआयसह काही प्रमुख पोलीस स्टेशनमध्ये महिला विश्रांतीकक्ष तयार केला आहे; पण वाहतूक पोलीस चौक्यांच्या ठिकाणी महिलांसाठी विश्रांतीकक्षच नाही. यामुळे बंदोबस्तावर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या कोकण भवनमध्ये महिला विश्रांतीकक्ष कुठे आहे, याची माहिती अनेकांना नाही. या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र भोजनकक्ष तयार केला आहे; पण या कक्षामध्ये वॉशबेसीनमधील पाणी जमिनीवर सांडलेले असून, त्याची योग्यपद्धतीने साफसफाई केली जात नाही.
नवी मुंबई महानगरपालिकेने २०० कोटी रुपये खर्च करून मुख्यालयाची उभारणी केली आहे. तळमजल्यावर महिला विश्रांतीकक्षही सुरू केला आहे; पण हा कक्ष बहुतांश वेळी बंदच असतो. महिला कर्मचाऱ्यांना त्याचा फारसा वापर करता येत नाही. काही महिला कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, प्रवेशद्वारावर कक्षाची चावी दिलेली असते. त्या ठिकाणी या कक्षाचा वापर कोणी व कधी केला, याची नोंदही ठेवली जाते; पण प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली असता प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांना याची काहीच माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. पालिकेच्या इतर कार्यालयांमध्येही महिलांसाठी भोजन व विश्रांतीकक्ष नाही. पालिकेचे विस्तीर्ण कँटीन असून, तेथेही महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. मुंबई बाजार समितीच्या मुख्यालयामध्ये महिला विश्रांतीकक्ष आहे.
।प्रसाधनगृहांमध्ये पैसेवसुली
रेल्वे स्टेशन, बसडेपो व इतर ठिकाणी प्रसाधनगृहचालकांनी महिलांकडून पैसे घेऊ नये, असा नियम आहे; परंतु प्रत्यक्षात या नियमांची अंमलबजावणी केली जात नाही. अनेक ठिकाणी पैसे वसूल केले जात आहेत. तक्रार करूनही त्यामध्ये सुधारणा होत नाही. प्रसाधनगृहचालकांकडून तक्रारवहीही उपलब्ध करून दिली जात नाही.
विश्रांतीकक्ष व इतर सुविधांची वस्तुस्थिती
नेरुळमध्ये महिलांसाठी बांधलेल्या सावली आधारकेंद्राच्या इमारतीचा वापर नाही
प्रमुख वाहतूक चौक्यांमध्ये महिला कर्मचाºयांसाठी कक्ष नाहीत
पालिका मुख्यालयामधील महिला विश्रांतीकक्षही बहुतांश वेळा बंदच
महिला विश्रांतीकक्षाचा वापर शिबिर व इतर उपक्रमांसाठीच
पालिका मुख्यालयामध्ये महिलांसाठी स्वतंत्र भोजनकक्षही नाही
कोकण भवनमधील महिला विश्रांतीकक्षाची कर्मचाºयांनाही माहिती नाही
कोकण भवनमधील भोजनकक्षामध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष
बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये महिला विश्रांतीकक्ष नाहीत
साफसफाई कर्मचाºयांसाठीची हजेरी शेड बंद असल्याने कर्मचाºयांची गैरसोय