खारघर, तळोजा परिसरातील प्रदूषणाचा विषय पेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 11:47 PM2021-01-30T23:47:29+5:302021-01-30T23:48:01+5:30
Pollution : गेल्या तीन वर्षांपासून खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशन प्रदूषणमुक्त वातावरणासाठी अतोनात संघर्ष करीत आहे.
पनवेल - गेल्या तीन वर्षांपासून खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशन प्रदूषणमुक्त वातावरणासाठी अतोनात संघर्ष करीत आहे. सामान्य हितसंबंधांच्या मुद्द्यांकरिता लढण्यासाठी, एकत्र आलेल्या शंभराहून अधिक सोसायट्यांचा समूह असलेल्या या संस्थेने गेल्या दोन वर्षांत अत्यंत नामांकित प्रयोगशाळांसह हवेच्या गुणवत्तेची चाचणी केली आणि आपण ज्या परिसरात राहतो तेथील हवा प्रदूषित आहे असा निष्कर्ष निघाला. मात्र याबाबत काहीच कारवाई होत नसल्याने एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केटीसीडब्लूए या संस्थेने सहायक पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
एक वर्षाआधी संस्थेने बेलापूर एमपीसीबीच्या कार्यालयासमोर मोर्चा काढला होता. या दरम्यान आंदोलनकाऱ्यांना, एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु आजतागायत तळोजा एमआयडीसी येथील कारखान्यांमधून वाढणाऱ्या वायुप्रदूषणाची पातळी वाढत असून योग्य कारवाई केली जात नसल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष मंगेश रनावडे यांनी केला आहे.
या वाढत्या वायुप्रदूषणामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना आणि रुग्णांना श्वसनाच्या आणि डोकेदुखीच्या तक्रारी वाढत आहेत. केटीसीडब्ल्यूचे अध्यक्ष मंगेश रानवडे आणि उपाध्यक्ष इम्तियाज शेख यांनी संपूर्ण केटीसीडब्ल्यूए टीम समवेत अतिरिक्त आयुक्त बी.जी. शेखर यांच्या कार्यालयाला भेट दिली आणि प्रदूषणाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल एमपीसीबी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी खारघर शहरात वातावरण फाउंडेशनने लावलेल्या कुत्रिम फुप्फुसांचे रंग अवघ्या दहा दिवसात काळवंडले होते. खारघर-तळोजा-पनवेल परिसरातील लोक दिवसांतून जवळपास १७ तास प्रदूषित हवेत श्वास घेतात. या भागातल्या हवेत सकाळी ६ ते ८ या वेळात पर्टिक्युलर मॅटर पोल्युटंट म्हणजेच पीएम २.५ हा घटक सर्वाधिक असतो, हे अभ्यासाअंती स्पष्ट झाले होते.