खराब रस्त्यांचा पर्यटन व्यवसायाला फटका
By admin | Published: November 7, 2016 03:04 AM2016-11-07T03:04:32+5:302016-11-07T03:04:32+5:30
खराब रस्त्यांमुळे येथील पर्यटन व्यवसाय गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ५० टक्क्यांनी घसरला आहे.
आविष्कार देसाई, अलिबाग
खराब रस्त्यांमुळे येथील पर्यटन व्यवसाय गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ५० टक्क्यांनी घसरला आहे. पर्यटन व्यावसायिकांना याचा सर्वाधिक आर्थिक फटका बसला आहे. ऐन दिवाळीचा हंगाम कोरडा गेल्याने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून पर्यटन उद्योगाला पुन्हा झळाळी मिळवून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
अलिबाग तालुक्यातील रस्त्यासंबंधित यंत्रणेने तातडीने दुरुस्ती करून पर्यटन व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळवून द्यावी, अशी मागणी पर्यटन व्यावसायिकांकडून केली जात आहे. अलिबाग हे वन डे पिकनिकसाठी सोयीस्कर आहे. मुंबई, पुण्यातील पर्यटक विशेष करून अलिबागला पसंती देतात. अलिबागसह आक्षी, नागाव, चौल, किहीम, वरसोली, नवगाव, मांडवा हे समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेलेले असतात. पर्यटनाच्या हंगामात येथे करोडो रुपयांची उलाढाल होते. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा येथे पर्यटकांची संख्या रोडावल्याने व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तालुक्यातील खराब रस्त्यांमुळे पर्यटकांनी येथे येणे टाळले आहे. येथील महाकाय खड्डेमय रस्त्यांमुळे गाड्यांना नुकसान होते. त्यामुळे आम्ही आमच्या गाड्या बाहेर काढल्याच नाहीत, असे मुंबईतील पर्यटक बिपीन श्रीवास्तव यांनी सांगितले. खराब रस्त्यांचा चांगलाच फटका पर्यटन व्यवसायाला बसला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी पर्यटकांची संख्या ५० टक्क्यांनी कमी झाल्याचे नागाव येथील व्यावसायिक मोरे हाऊसचे हर्षल मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दिघी ते मोर्बा फाटा रस्त्याची चाळण
1म्हसळा : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दिघी पोर्टकडून अवजड व ओव्हरलोड वाहतूक दिघी - माणगाव राज्य मार्ग क्र . ९८ वरून होते. श्रीवर्धन, म्हसळा व माणगाव तालुक्यातून जाणाऱ्या नागरी वाहतुकीसाठी असलेल्या राज्यमार्गाची १९ टन वाहतूक क्षमता असताना दिघी पोर्टकडून २० ते ४० टनापर्यंत वाहतूक केली जाते. यामुळे दिघी ते माणगाव शहराला जोडणारा मोर्बा फाटा असा ५५ किमीचा मार्ग खड्ड्यांत हरवला आहे. या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी हैराण झाले आहेत.
2श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्टमधून मोठ्या प्रमाणावर कोळसा, लोखंडी कॉईलची २० ते ४० टनांपर्यंत अवजड व ओव्हरलोड वाहतूक माणगांव, महाड, खेड व अन्य ठिकाणी दिघी - माणगाव मार्गावरून होते. हा दिघी - म्हसळा - माणगाव राज्य मार्ग क्र . ९८ सुमारे ५५ किमीचा हा रस्ता १९५८ ते ६२ च्या सुमारास लोकल बोर्डाने तयार केला होता. जिल्हा परिषदेकडून राज्य मार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केल्यानंतर रस्त्याची दुरु स्ती, डांबरीकरण, छोटे - मोठे पूल बनविण्यात आले.
3रस्त्यांचा व पुलांचा दर्जा १९ टन वाहतुकीच्या क्षमतेचा बनविण्यात आला. दरम्यान, हा मार्ग बांधकाम विभागाने मेरीटाईम बोर्ड व नंतर दिघीपोर्टला वर्ग केला. सद्यस्थितीत दिघीपोर्टकडून गेली अनेक वर्षे२० ते ४० टन क्षमेच्या अवजड वाहनांची येथून वाहतूक होते. यामुळे दिघी, वडवली, खनलोस, मेंदडी, म्हसळा शहर, बाह्यवळण रस्ता, घोणसे घाट, साई, मोर्बा घाट आदी ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे.
4 म्हसळ्यातील आगरवाडा येथील पुलाचा पाया खचला असल्याने पुलांची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे. म्हसळ्यातील खरसई, मेंदडी, अगरवाडा,म्हसळा शहर याचप्रमाणे श्रीवर्धन व माणगाव तालुक्यातील पुलांची तत्काळ दुरु स्ती होणे गरजेचे आहे. दिघी-माणगाव या महत्त्वाच्या मार्गाचा पुणे, मुंबई व अन्य ठिकाणी जाण्यासाठी वापर होतो. गेली अनेक वर्षे मार्गावरील रस्त्याची देखभाल व दुरु स्ती केली नसल्याने श्रीवर्धन म्हसळा व माणगाव तालुक्यातील या मार्गाच्या दुरवस्थेला दिघी पोर्ट व राज्य सरकारच जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे .
पोलादपूर तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था
पोलादपूर : रस्ते हे ग्रामीण विकासाचा कणा समजले जातात. मात्र पोलादपूर येथे रस्त्यावरील खड्ड्यांतून मार्ग शोधावा लागत आहे, अशी भयानक अवस्था येथील रस्त्यांची झाली आहे. धामणदेवी ते कोंढवी, बागवाडी-फणसकोंड ते मोरेवाडी, पळचिल गोलदरा ते आदाचीवाडी, पितळवाडी ते कामथे, पितळवाडी ते तिवेली, पितळवाडी ते केवनाळे, चरई ते बोरावळे, रेवनाडी ते कोतवाल, लोहारे ते तुर्भे येथील रस्त्यांची पुरती चाळण झाली असून या रस्त्यावरून प्रवास करणे मोठे जिकिरीचे बनले आहे. यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
वाहन चालकांतून तीव्र नाराजी पसरली आहे. तर या रस्त्यावरून प्रवास करताना पाठीचे मणके खिळखिळे होत असल्याचे प्रवासी व ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याकडे संबंधित खात्याला आणि लोकप्रतिनिधींना लक्ष देण्यास वेळ नाही. अधिकारी मस्त आणि लोकप्रतिनिधी सुस्त अशी खोचक प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे. या विभागातील प्रवासी जनतेला खड्ड्यातून रस्ता शोधत प्रवास करावा लागत आहे. रेववाडी ते कोतवाल रस्त्यावर एक मोरी खचली असून या ठिकाणी एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता निमाण झाली आहे.पावसाळा संपून एक महिन्या उलटला असला तरीही संबंधित खात्याकडून कोणत्याही रस्त्याच्या डागडुजीला सुरुवातही नसल्याने येथील ग्रामस्थांतून आणि प्रवासी जनतेतून खेद व्यक्त केला जात आहे. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे वाहनांचेही नुकसान होत आहे. वाहन खड्ड्यात आदळून स्प्रिंग तुटणे, पाटे तुटणे, टायर पंक्चर होणे अशा अनेक समस्यांना चालकांना सामोरे जावे लागत असून यामुळे प्रवाशांचाही खोळंबा होतो. संबंधित खात्याने त्वरित रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी या विभागातील जनतेतून केली जात आहे.