राष्ट्रवादीच्या ३ नगरसेवकांचे पद धोक्यात
By Admin | Published: May 2, 2016 02:19 AM2016-05-02T02:19:01+5:302016-05-02T02:19:01+5:30
अतिक्रमण प्रकरणी राष्ट्रवादी काँगे्रसच्या तीन नगरसेवकांना पद का रद्द करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आयुक्तांची बदली झाल्याने २९ एप्रिलला
नवी मुंबई : अतिक्रमण प्रकरणी राष्ट्रवादी काँगे्रसच्या तीन नगरसेवकांना पद का रद्द करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आयुक्तांची बदली झाल्याने २९ एप्रिलला होणारी सुनावणी पुढे ढकलली असून नवीन आयुक्त काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई महापालिकेमधील राष्ट्रवादी व शिवसेनेच्या जवळपास ८ सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकली आहे. जवळपास चार नगरसेवकांवर अतिक्रमणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. काही जणांचे जातप्रमाणपत्र वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. जातप्रमाणपत्र बनावट असल्याप्रकरणी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिघा परिसरातील नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते व दीपा गवते यांच्यावरही अतिक्रमणाचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे अशी तक्रारही करण्यात आली होती. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पालिका प्रशासनाने या तीनही नगरसेवकांना तुमचे नगरसेवक पद का रद्द करू नये अशी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. २९ एप्रिलला आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे सुनावणी होणार होती. परंतु आयुक्तांचीच बदली झाल्यामुळे सुनावणी होवू शकली नाही.
महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झालेले तुकाराम मुंडे हे सोमवारी पदभार स्वीकारणार आहेत. आता या नगरसेवकांची सुनावणी ते कधी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दिनेश वाघमारे यांनी जाता - जाता राष्ट्रवादीला धक्का दिल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. परंतु प्रशासनाने अशाप्रकारे कोणालाही धक्का देण्यासाठी ही नोटीस दिलेली नाही. सर्व प्रक्रिया पार पाडून गत आठवड्यात नोटीस दिली होती व त्यावर सुनावणीही घेण्यात येणार होती, असे सांगितले आहे.
दिघा व ऐरोली परिसरातील शिवसेनेच्याही दोन नगरसेवकांवर अतिक्रमणाचा ठपका आहे. एक नगरसेवकावर गुन्हा दाखल झाला असून राष्ट्रवादीच्या सदस्यांवर कारवाई झाली तर शिवसेनेवर कारवाई करण्यासाठीही हालचाली होण्याची चर्चा सुरू झाली आहे.