भाजपाच्या राज्यव्यापी अधिवेशनाची तयारी पूर्ण; खासदार आमदारांसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची होणार बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 11:16 AM2020-02-15T11:16:09+5:302020-02-15T11:16:28+5:30
संकल्प नव्या वाटचालीचा, महाराष्ट्राच्या सन्मानाचा, अशी घोषणा करत भारतीय जनता पक्षाचे दोन दिवसाचे राज्यव्यापी अधिवेशन 15 व 16 फेब्रुवारीला नवी मुंबईमध्ये होत आहे.
नवी मुंबई- संकल्प नव्या वाटचालीचा, महाराष्ट्राच्या सन्मानाचा, अशी घोषणा करत भारतीय जनता पक्षाचे दोन दिवसाचे राज्यव्यापी अधिवेशन 15 व 16 फेब्रुवारीला नवी मुंबईमध्ये होत आहे. शनिवारी पहिल्या दिवशी नेरूळ रेल्वे स्टेशनच्या समोर तेरणा दंतवैद्यकीय महाविद्यालयात दुपारी दोन ते चारदरम्यान खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष ,जिल्हा अध्यक्षांची बैठक होणार आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत या बैठकीची तयारी सुरू होती. पामबीच रोड, नेरूळ रेल्वे स्टेशन रोड सर्वत्र भाजपचे ध्वज लावले आहेत, महामार्गासह शहरात सर्व ठिकाणी होर्डिग्स लावण्यात आले आहेत. चार वाजता बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.
रविवारी सायन पनवेल महामार्गावर नेरूळ मध्ये जाहीर अधिवेशन होणार असून त्याला दहा हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे अधिवेशन नवी मुंबई होत असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या अधिवेशनामुळे नवी मुंबईमधील भाजपा पदाधिका-यांचे मनोबल वाढण्यासही मदत होणार आहे.