पनवेल परिसरात खासगी क्लासेसचे पेव
By admin | Published: April 19, 2016 02:37 AM2016-04-19T02:37:22+5:302016-04-19T02:37:22+5:30
पूर्वी निकाल चांगला लागावा याकरिता शाळेत आणि महाविद्यालयात शिक्षक विद्यार्थ्यांकडून पूर्ण तयारी करून घ्यायचे. त्याकरिता अतिरिक्त तासिका घेतल्या जायच्या
अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली
पूर्वी निकाल चांगला लागावा याकरिता शाळेत आणि महाविद्यालयात शिक्षक विद्यार्थ्यांकडून पूर्ण तयारी करून घ्यायचे. त्याकरिता अतिरिक्त तासिका घेतल्या जायच्या. वेळप्रसंगी सुटीच्या दिवशी अतिरिक्त शिकवणी घेतली जायची. मात्र अलीकडे शिक्षण पूर्णपणे खासगी क्लासेसच्या आहारी जाऊ लागल्याने शाळेतील शैक्षणिक दर्जा घसरत आहे.
पनवेल परिसरातील खासगी क्लासेसची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शाळेचे शुल्क त्याचबरोबर खासगी क्लासेसचे पॅकेज भरता भरता पालक मेटाकुटीला येत आहेत.
शाळेत शिकवणारे विशेषत: विनाअनुदानित शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक हे खासगी क्लासेसमध्ये शिकवताना दिसतात. रहिवासी संकुल, सदनिका त्याचबरोबर गाळे भाडेतत्त्वावर घेऊनही अनेकांनी खासगी क्लासेस सुरू केले आहेत. पनवेल शहरातील बहुतांश शाळा विनाअनुदानित, खासगी स्वरूपात आहेत. याठिकाणी शिक्षकांना कमी वेतन दिले जाते. त्यामुळे याठिकाणी शिकवणारे शिक्षकही दुसरीकडे चांगली नोकरी मिळाली अथवा खासगी क्लासमध्ये चांगले पैसे मिळत असल्यास नोकरी सोडून जात असल्याचे अनेकदा पालकांकडून ऐकायला मिळते.
दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच काही क्लासेसमध्ये अकरावी-बारावीसाठी प्रवेश सुरू करण्यात आला असून त्यासाठी पूर्वपरीक्षा घेण्यात येत आहे आणि या परीक्षेतील गुणांनुसार विद्यार्थ्यांना सवलतीही देण्यात येत आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, माहिती-तंत्रज्ञानात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी स्वतंत्र क्लासेस असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. पनवेलबरोबरच कळंबोली, कामोठे, खारघर या ठिकाणी शेकडो खासगी क्लासेस आहेत. नववी, दहावीकरिता ९0 हजार ते १लाख २0 हजार इतके पॅकेज या ठिकाणी घेतले जात आहे. अकरावी व बारावीकरिता १ लाख ते दीड लाख रुपये फी विद्यार्थ्यांकडून घेतली जात आहे.