सानपाडा स्टेशन परिसराला समस्यांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 03:49 AM2018-07-09T03:49:19+5:302018-07-09T03:49:42+5:30
सानपाडा रेल्वेस्थानकाच्या महामार्गाकडील बाजूला समस्यांचा विळखा पडला आहे. रिक्षाचालकांसह खासगी वाहनांच्या बेशिस्तपणामुळे वाहतूककोंडी होत आहे. या परिसरामध्ये चक्क पाच रिक्षा स्टँड तयार झाले असून, पोलिसांसह आरटीओ याकडे दुर्लक्ष करत आहे.
नवी मुंबई - सानपाडा रेल्वेस्थानकाच्या महामार्गाकडील बाजूला समस्यांचा विळखा पडला आहे. रिक्षाचालकांसह खासगी वाहनांच्या बेशिस्तपणामुळे वाहतूककोंडी होत आहे. या परिसरामध्ये चक्क पाच रिक्षा स्टँड तयार झाले असून, पोलिसांसह आरटीओ याकडे दुर्लक्ष करत आहे. भिकाऱ्यांसह चोरट्यांचा उपद्रव वाढला असून, नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी असंतोष निर्माण होऊ लागला आहे.
नवी मुंबईमधील सर्वात दुर्लक्षित नागरी वसाहत म्हणून सानपाडा रेल्वेस्थानकासमोरील परिसराची ओळख निर्माण होऊ लागली आहे. दोन रेल्वेस्थानक व महामार्ग जवळ असल्यामुळे अनेक मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय नागरिकांनी या परिसरामध्ये जादा दर देऊन घरे विकत घेतली आहेत; परंतु येथील नागरिकांना कोणत्याही सुविधा महापालिकेने दिलेल्या नाहीत. या परिसरामध्ये एकही उद्यान व मैदान अस्तित्वात नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी करमणूक केंद्र, समाजमंदिर व इतर कोणतीही सुविधा नाही. परिसरातील समस्या सोडविण्याकडेही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. सानपाडा रेल्वेस्थानक परिसरामध्ये सिडकोने नियोजनबद्ध रिक्षा स्टँड तयार केले आहे; परंतु रिक्षाचालक नियमानुसार स्टँडमध्ये रिक्षा उभ्या करत नाहीत. स्टेशनच्या मुख्य गेटसमोर अनधिकृतपणे रिक्षा उभ्या केल्या जातात. बिकानेरसमोर व नीलम बार समोरही अनधिकृत स्टँड सुरू असून, भुयारी मार्गाच्या समोर एक स्टँड सुरू आहे. मुख्य व भुयारी मार्गाच्या समोरील स्टँड वगळता इतर तीन स्टँड अनधिकृत आहेत. रिक्षा संघटनाही शिस्त लावण्यासाठी काहीही उपाययोजना करत नाहीत. वाहतूक पोलीस व आरटीओचेही बेशिस्त चालकांना अभय आहे. या ठिकाणी पूर्वी ओलाच्या टॅक्सी अनधिकृतपणे उभ्या केल्या जात होत्या. आता त्यांचे प्रमाण कमी झाले असून, उबेरच्या व इतर खासगी टॅक्सी अनधिकृतपणे उभ्या केल्या जात असून, त्यामुळे हावरे सेंच्युरियन ते चिराग हॉटेलपर्यंत चक्काजामची स्थिती निर्माण होऊ लागली आहे.
सानपाडा उड्डाणपुलाखाली भिकाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भिकाºयांमुळे येथील समस्या वाढू लागल्या आहेत. उघड्यावर प्रातर्विधी केले जात असल्यामुळे या परिसरामध्ये दुर्गंधी वाढू लागली असून, साथीचे आजार पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चोरीचे प्रमाणही वाढू लागले आहे.
मंदिराच्या दानपेटीपासून घराबाहेर ठेवलेल्या चपला व इतर वस्तूंचीही चोरी होऊ लागली आहे. याविषयी वारंवार तक्रारी करूनही महापालिका व पोलीस प्रशासन काहीही कारवाई करत नसल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आयुक्तांनाही
सानपाड्याचा विसर
महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरातील प्रत्येक विभागाला भेट देऊन तेथील समस्यांची पाहणी केली आहे; परंतु सानपाडा रेल्वेस्थानकासमोरील परिसराला अद्याप भेट दिलेली नाही. आयुक्त कधी भेट देणार, असा प्रश्न येथील केशवकुंज, बालाजी टॉवर, अभिषेक, साईकला, रोषण हाउस, मंगलमूर्ती या इमारतींमधील रहिवासी विचारू लागले आहेत.
भिका-यांनी दिली धमकी
भिकारी व मुले या परिसरात भीक मागत फिरत असतात. रोजच्या त्रासामुळे एका व्यावसायिकाने भीक देण्यास नकार दिला व लहान मुलांना दुकानातून हाकलून दिले. थोड्या वेळाने १५ ते २० भिकारी हातामध्ये दगड घेऊन आले व तुमचे दुकान फोडून टाकू, अशी धमकी देऊन गेल्याची घटनाही घडली होती.
रेल्वेस्थानकासमोर पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. रिक्षाही बेशिस्तपणे कुठेही उभ्या केल्या जात आहेत. सकाळी स्थानक परिसरात काळ्या-पिवळ्या सोंगट्यांचा जुगार सुरू असतो. भिकाºयांचा उपद्रवही वाढला असून, चोरीच्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
- राजेश राय,
भाजपा उपाध्यक्ष,
ठाणे व पालघर जिल्हा
सानपाडा परिसरातील रोडची स्थिती बिकट झाली आहे. बेशिस्त पार्किंगमुळे वारंवार वाहतूककोंडी होऊ लागली आहे. समस्यांचा विळखा पडला असून, महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
- रंजना कांडरकर,
विभाग संघटक,
शिवसेना
रेल्वेस्थानक समोरची स्थिती बिकट झाली आहे. रिक्षा कुठेही उभ्या केल्या जात आहेत. खासगी टॅक्सी व वाहनेही रोडच्या दोन्ही बाजूला उभी केली जात असून, सकाळी व सायंकाळी चक्काजामची स्थिती होत आहे.
- हितेश चौधरी,
व्यावसायिक, सानपाडा
समस्यांचा विळखा सोडविण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही. भुयारी मार्गाच्या बाहेरही वाहतूककोंडी होत आहे. वाहतूक समस्या, भिकारी, नागरी सुविधांची स्थिती बिकट असून, महापालिका व पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे.
- यशवंत रामाणे,
रहिवासी,
सानपाडा
रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा
सानपाडा रेल्वेस्थानकासमोर सिडकोने सुसज्ज रिक्षा स्टँड उभारले आहे; परंतु रिक्षाचालक जादा पैसे मिळावे, यासाठी स्टँडमध्ये रिक्षा उभ्या करत नाहीत. रिक्षा संघटनेचा त्यांच्या सभासदांवर काहीही वचक राहिलेला नाही. रिक्षा स्थानकाच्या गेटसमोर उभ्या केल्या जात आहेत. तीन अनधिकृत स्टँड तयार केली असून, त्याचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. बेशिस्त चालकांवर वाहतूक पोलीस व आरटीओने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.