‘राफेलची खरेदी अंबानीच्या फायद्यासाठी’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 12:27 AM2019-03-08T00:27:09+5:302019-03-08T00:27:25+5:30
राफेलच्या व्यवहाराच्या फाईल गहाळ झाल्या आहेत. एकूणच राफेल करार देशासाठी नसून तो अनिल अंबानी यांच्या हितासाठी घेतल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी पनवेल येथे केला आहे.
पनवेल : राफेलच्या व्यवहाराच्या फाईल गहाळ झाल्या आहेत. एकूणच राफेल करार देशासाठी नसून तो अनिल अंबानी यांच्या हितासाठी घेतल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी पनवेल येथे केला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी राजकारण केल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
पनवेलमधील खांदा वसाहतीत गुरुवारी बहुजन वंचित आघाडीची सभा अयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. पनवेलमध्ये सनातनच्या आश्रमात हत्यारे सापडली. त्यांच्यावर नियंत्रण नसल्याने दाभोलकर, कलबुर्गी, पानसरेसारख्या विचारवंतांना आपले प्राण गमवावे लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. माजी आमदार लक्ष्मण माने यांनी देखील सभेला मार्गदर्शन केले. बहुजनांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आहवान यावेळी माने यांनी उपस्थितांना केले. याप्रसंगी एमआयएमचे हाजी शहनवाज खान, अभिनेते जयवंत भालेकर, नवनाथ पडळकर, महादेव वाघमारे, राजाराम पाटील आदींसह मोठ्या संख्येने एमआयएम व भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.