नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. एकाच दिवशी १ लाख २८ हजार पेट्या आंबा विक्रीसाठी मार्केटमध्ये दाखल झाला आहे. यामध्ये ८५ हजार ५६० पेटी कोकणातील हापूसचा समावेश आहे.
बाजार समितीच्या फळमार्केटमध्ये आंब्याचे राज्य सुरू झाले आहे. रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड, कर्नाटक, तामिळनाडूसह केरळमधून आंबा विक्रीसाठी येत आहे. या हंगामातील सर्वाधिक आवकची नोंद सोमवारी झाली असून, फेब्रुवारीपासून पहिल्यांदाच एक लाख पेट्यांचा टप्पा ओलांडला आहे. मध्यरात्रीपासून ते सायंकाळपर्यंत कोकणातून ८५,५६० व इतर राज्यांतून ४२,८५० अशा एकूण १ लाख २८ हजार ४१० पेट्यांची आवक झाली.
आवक वाढल्यामुळे बाजारभावही कमी झाले आहेत. कोकणच्या हापूसला बाजार समितीमध्ये २०० ते ८०० रुपये डझन भाव मिळत आहे. किरकोळ मार्केटमध्ये हापूस ४०० ते १२०० रुपये डझन दराने विकला जात आहे. कर्नाटकमधील हापूससदृश आंबा ७० ते १३० रुपये किलो, बदामी ४० ते ६०, तोतापुरी २५ ते ३०, लालबाग ३० ते ६० , गोळा ३५ ते ४० रुपये किलो दराने विकला जात आहे.
दरम्यान, या महिन्याच्या अखेरपर्यंत आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. नागरिकांना जूनअखेरपर्यंत आंबा उपलब्ध होणार आहे. आंब्याचे दरही नियंत्रणात असल्यामुळे आंबाखरेदीसाठी हीच योग्य वेळ असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.