ठाणे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील 50 कोटी जनतेला उपचारांवरील खर्चातून मोठा दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. रिलायन्ससारख्या रुग्णालयानेही सर्वसामान्य जनतेला उत्तम आणि आधुनिक सेवा देऊन या "मोदी केअर" मध्ये योगदान द्यावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील रिलायन्स हॉस्पिटलचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
सरकार उच्च दर्जाच्या व परवडणाऱ्या सार्वजनिक आरोग्याच्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. गेल्या काही वर्षांत देशभरातील निदान केंद्रे आणि सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने विविध रोगांविषयी माहिती होऊन त्यावरील उपचारही उपलब्ध होत आहेत. मुंबईत वैद्यकीय उपचारांसाठी इतर देशांतून रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे. परवडणारी आणि सहज उपलब्ध असणारी वैद्यकीय सेवा आवश्यक बाब असून हेल्थकेअर क्षेत्रात आणखीही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे नोकरीच्या संधीही वाढतील, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच रिलायन्सच्या रुग्णालय सेवेचे कौतूक करताना, रिलायन्सच्या या हॉस्पिटलमध्ये जनरल वार्डसुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने सुसज्ज केला आहे की, तेथील रुग्णही हे वातावरण पाहून लवकरच बरा होईल, असे फडणवीस म्हणाले. या हॉस्पिटलमध्ये सर्वाना समान दर्जाच्या सेवा व उपचार मिळणार आहेत. त्यामुळे गरीब असो वा श्रीमंत सर्वांनाच एकसमान उपचारपद्धती मिळेल ही निश्चितच समाधानाची बाब आहे. रिलायन्सच्या या उपक्रमात राज्यातील अगदी छोट्या शहरांतही येणाऱ्या काळात 19 कॅन्सरवरील उपचार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. कॅन्सरचे वाढते प्रमाण पहाता याची मोठी आवश्यकता आहे आणि या समूहाची ही मोठी झेप ठरेल असे फडणवीस यांनी शेवटी म्हटले. दरम्यान, उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्रात कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती आहे.
रिलायन्स हॉस्पिटलची वैशिष्टये
• आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज • अत्याधुनिक साधनसामुग्री• संसर्ग होऊ नये म्हणून सुसज्ज रुम• 36 स्पेशल विभाग• 125 तज्ज्ञ डॉक्टर आणि 225 बेडस्• 4 आंतराष्ट्रीय गुणवत्तेचे ऑपरेशन थिएटर• रेडिएशन टेक्नोलॉजिसह अत्याधुनिक सुविधा