नवी मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेलेल्या सहा अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या सहाही मुली एकाच महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणावरून बेपत्ता झाल्या होत्या. याप्रकरणी तपासादरम्यान अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने त्यांचा शोध घेवून कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे.मागील काही दिवसांपासून शहरातून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यानुसार महिन्याभरात खारघर, उरण, कोपरखैरणे, एनआरआय व कामोठे पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अल्पवयीन मुलगी अपहरण झाल्याचे गुन्हे दाखल होते. बेपत्ता होणाऱ्या मुली १५ ते १७ वयोगटातल्या असल्याने त्यांचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याशिवाय या मुलींच्या जीविताला देखील धोका असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने तपासाला सुरवात केली होती. चौकशीदरम्यान बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुली प्रेमसंबंधातून तरुणांच्या संपर्कात होत्या अशी माहिती समोर आली. त्यानुसार या मुलींचा शोध घेण्यासाठी उपआयुक्त तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक आनंद चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक सुनीता भोर, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर, ज्योती सूर्यवंशी आदींची विविध पथके तयार करण्यात आली होती. त्यांनी तांत्रिक तपासाआधारे बेपत्ता मुलींच्या मित्रांची माहिती मिळवून त्यांच्या सध्याच्या ठिकाणावर छापे टाकले. त्यानुसार सर्वच मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे उघड झाले. त्यांना उरण, गुजरात, उत्तरप्रदेश यासह नवी मुंबईच्या विविध भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांना पळवून नेणाºया तरुणांना ताब्यात घेवून त्यांच्याविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर ताब्यात घेतलेल्या मुली सुखरूप पालकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. या प्रकरणांवरून अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेण्याचे प्रकार शहरात घडत असल्याचे समोर आले आहे.
पळवलेल्या ‘त्या’ मुलींचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 4:11 AM