‘महिला विशेष’ला पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 11:43 PM2020-10-01T23:43:10+5:302020-10-01T23:43:27+5:30
पूर्वीच्या वेळेत लोकल सोडा : महिलांनी केल्या मागण्या; जेवढी आसनव्यवस्था तेवढेच प्रवासी घ्या
डोंबिवली : मध्य रेल्वेवरील लोकलना होणारी गर्दी विचारात घेऊन तसेच महिलांच्या मागणीनुसार सहा महिन्यांनंतर गुरुवारपासून पुन्हा महिला विशेष लोकल सुरू करण्यात आली. मात्र, पहिल्या दिवशी या लोकलला महिला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला. कल्याणहून सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी सुटलेल्या या लोकलमध्ये डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांत फारशा महिला चढल्या नाहीत, असे सांगण्यात आले.
‘महिला विशेष’चा गुरुवारी पहिलाच दिवस असल्याने महिलांना या लोकलबाबत माहिती नसावी. अजून आठवडाभर अंदाज घेऊन या लोकलची वेळ बदलण्यासंदर्भात मागणी करायची की नाही, हे ठरवणार असल्याचे उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेतर्फे सांगण्यात आले.
काही महिलांनी सांगितले की, फेब्रुवारीपर्यंत महिला विशेष लोकल कल्याण येथूनच सकाळी ८ वाजून ३ मिनिटांनी सुटत होती. डोंबिवलीला ती सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी यायची. एरव्ही, ठाकुर्ली व डोंबिवली स्थानकांत ती पूर्ण भरत असे. त्यामुळे ही लोकल पूर्वीच्याच वेळी सोडावी, जेणेकरून त्या सवयीनुसार प्रवास करणे सोपे जाईल. तर, काही महिला म्हणाल्या की, सकाळी ९ वाजता स्थानकांमध्ये महिलांची गर्दी वाढते, त्यामुळे तेव्हा ही लोकल सोडावी. ही लोकल गुरुवारी रिकामी धावल्याने फिजिकल डिस्टन्सिंग राखले गेले. जेवढी आसनव्यवस्था आहे, तेवढेच प्रवासी डब्यात असल्यास कोरोनाला प्रतिबंध घालणे सोपे जाणार आहे, असे काहीनी सांगितले.
बदलापूरहून आणखी एक लोकल हवी
आगामी काळात महिला विशेष लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी. एक लोकल कल्याणहून सकाळी पूर्वीच्या वेळेत तर, दुसरी लोकल सकाळी ९ च्या सुमारास बदलापूरहून सोडावी, अशी मागणी प्रवासी संघटना करणार आहेत.