नवी मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १४ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात मनसेच्या प्रतिरूप मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी या प्रतिरूप मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आली असून, या प्रतिरूप मंत्रिमंडळात मनसेच्या अनेक नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रतिरूप मंत्रिमंडळात प्रत्येक खात्यासाठी एकाहून अधिक नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, प्रतिरूप मंत्रिमंडळात अधिकाधिक नेत्यांचा समावेश करण्यामागचे कारण राज ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान उघड केले.
राज ठाकरे म्हणाले की, या प्रतिरूप मंत्रिमंडळात अनेक जणांचा समावेश केला आहे. या प्रतिरूप मंत्रिमंडळाची घोषणा झाल्यानंतर कुणाला मंत्री झाल्यासारखं वाटू नये म्हणून प्रत्येक खात्यासाठी एकापेक्षा अधिक नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रतिरूप मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या नेत्यांनी केवळ सरकारचे वाभाडेच काढावेत अशी अपेक्षा नाही. तर सरकारने चांगले काम केल्यास त्यांनी मंत्रिमंडळाचे अभिनंदन करावे. मात्र चुकीचं काम केल्यास सरकार चालवणाऱ्या मंत्रिमंडळाचे वाभाढे काढावेत. तुम्ही चांगले काम कराल, अशी अपेक्षा आहे.’’
नवी मुंबईत झालेल्या वर्धापन दिन सोहळ्यात मनसेचे प्रतिरूप मंत्रिमंडळ जाहीर झाले असून, त्यांच्यावर राज्य सकारच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- कुणाला मंत्री झाल्यासारखं वाटू नये म्हणून प्रतिरूप मंत्रिमंडळात एवढ्यांचा समावेश केला- मंत्र्यांनी चांगले काम केल्यास प्रतिरूप मंत्रिमंडळाने त्यांचे अभिनंदन करावे, मात्र चुकीचं काम केल्यास सरकारचे वाभाढे काढावे
- गेल्या १४ वर्षात मनसेचे १३ आमदार अनेक नगरसेवक निवडून आले
- मनसेच्या आजच्या स्थितीवर टीका होते, पण ६० वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसची अवस्था काय
- दिल्लीत काँग्रेसचा अमदार एकही निवडून आला नाही, ७० पैकी ६३ ठिकाणी डिपॉझिट जप्त झाले
- लाटा येतात, अनेकांना धक्के बसतात, २०१४ मध्ये मायावतींचा एकही खासदार निवडून आला नव्हता
- अनेक चढउतार पाहत असताना तुम्ही माझ्यासोबत राहिलात त्याबाबत धन्यवाद
- एवढे पराभव झाल्यानंतरही राज ठाकरेसोबत लोक राहतात कसे, याच गोष्टीचं अनेकांना आश्चर्य वाटतं
- मनसेने अनेक आंदोलने केली, मनसे वगळता कुणी एवढी आंदोलने केलीत का, काही कामे पूर्णही झाली
- सत्तेवर असणाऱ्यांपेक्षा माझ्याकडून अपेक्षा, या अपेक्षांचं मी काय करू
- इतर महत्त्वाचे मुद्दे येत्या २५ मार्चला मांडणार
- प्रतिरूप मंत्रिमंडळात कुणालाही काम करायं असल्यास माझ्याशी संपर्क साधा
- सध्या देशात आरटीआय टाकून ब्लॅकमेल करणे हा उद्योग झालाय
-प्रतिरूप मंत्रिमंडळातील व्यक्तींनी आरटीआय टाकून ब्लॅकमेल करू नये