नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 05:45 AM2018-07-08T05:45:55+5:302018-07-08T05:46:10+5:30
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाने गती घेतली आहे. पहिल्या टप्प्याच्या विकासास अपेक्षित जमीन हस्तांतरण करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्वाक्षरी केली.
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाने गती घेतली आहे. पहिल्या टप्प्याच्या विकासास अपेक्षित जमीन हस्तांतरण करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्वाक्षरी केली. त्यामुळे विमानतळाच्या कामाला गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
नवी मुंबई विकासासाठी एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्हेईकल) अंतर्गत नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. आणि सिडको यांच्यात हा करार करण्यात आला. या करारानुसार एनएमआयएलअंतर्गत जीव्हीके इंटरनॅशनल कंपनी विमानतळाचा विकास करणार आहे. पहिल्या टप्प्याच्या विकासकामासाठी आवश्यक जमिनीच्या हस्तांतरणाच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, सह व्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जी.व्ही.के. कंपनीचे अध्यक्ष डॉ. जी.व्ही. रेड्डी, संजय रेड्डी आदी उपस्थित होते.