पनवेल मनपातील लघुलेखक वेतनापासून वंचित, कर्मचा-याची न्यायासाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:55 AM2017-12-17T01:55:56+5:302017-12-17T01:56:07+5:30
पनवेल महापालिकेमध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून लघुलेखकाची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित लघुलेखकाने पालिकेच्या निवडणुकीच्या बैठका व नंतर पाच महासभांचे कामकाज पाहिले.
- वैभव गायकर
पनवेल : पनवेल महापालिकेमध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून लघुलेखकाची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित लघुलेखकाने पालिकेच्या निवडणुकीच्या बैठका व नंतर पाच महासभांचे कामकाज पाहिले. यासाठीचे एकूण १ लाख २१ हजार रुपये मानधन अद्याप त्यांना देण्यात आलेले नाही. केलेल्या कामाचा मोबदला मिळावा, यासाठी लखुलेखक संजय पाटील यांनी पाठपुरावा सुरू केला आहे; परंतु प्रशासन सर्व जबाबदारी ठेकेदारावर झटकत असल्यामुळे संबंधितांना न्याय कोण देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आयुक्त, महापौर तसेच विरोधी पक्षनेत्यांना यासंदर्भात पत्र लिहून संबंधित लघुलेखकाने गंभीर आरोप पालिका प्रशासनावर केले आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेपासून संबंधित लघुलेखक पालिकेचे कामकाज करीत आहे. या कामकाजात पालिकेच्या निर्मितीसाठी तत्कालीन कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीचे सर्व कामकाज, निवडणुकीबाबत झालेल्या सभा, पाच महासभा आदींचे काम या एका लघुलेखकाने केले. या कामाचा मोबदला म्हणून पालिकेमार्फत प्रत्येक महासभा १५ हजार रु पये, निवडणुकीच्या तीन सभांचे २१ हजार रुपये, तसेच पालिका निर्मिती स्थापनेसाठी समितीच्या कामकाजाचे २० हजार रु पये, असे एकूण १२१००० रु पये पालिका देणे असल्याचे, हे कामकाज पाहणारे लघुलेखक संजय पाटील यांचे म्हणणे आहे. यापैकी ४४५०० रु पये पालिकेने देऊ केले आहेत. मात्र, उर्वरित ७६५०० रु पये देण्यास पालिका टाळाटाळ करीत असल्याचा आरोप महापौरांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. विशेष म्हणजे, इतिवृत्त लिहिण्यासाठी कमीत कमी आठ ते दहा लघुलेखक लागत असतानाही केवळ एका लघुलेखकाची नेमणूक करून पालिकेने वेळोवेळी वेळ मारून घेतली आहे. पालिकेला मनुष्यबळ पुरविणारे आदेश नाईक यांनी संजय पाटील यांची नियुक्ती लघुलेखक म्हणून केली होती. विशेष म्हणजे, मागील महासभेत या कंत्राटदारावर ठपका ठेवत महापौरांनी या कंत्राटदाराच्या निलंबनाचे आदेश दिले होते.
पनवेल महानगरपालिकेच्या प्रत्येक महासभेत इतिवृत्तातील चुका, इतिवृत्त वेळेवर मिळत नसल्याची तक्र ार सत्ताधारी, तसेच विरोधकांनी वेळोवेळी केली आहे. मात्र इतिवृत्त लिहिण्याचे काम पाहणाºया संजय पाटील यांनी पालिकेच्या वेळकाढू धोरणाचा पंचनामा केला असल्याचे या पत्रामधून उघड झाले आहे.
मी पालिका सचिवपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वीपासून संजय पाटील हे लघुलेखक म्हणून कामकाज पाहतात. संबंधित विषय हा ठेकेदार व लघुलेखक यांचा अंतर्गत विषय आहे. त्यांची नियुक्ती ठेकेदारांमार्फत झाली आहे. तसेच यासंदर्भात कागदोपत्री माझ्यासमोर काहीच आले नसल्याने ते समोर आल्याशिवाय मी या विषयावर काही बोलू शकत नाही.
- अनिल जगधणे,
सचिव, पनवेल महानगरपालिका
पालिका सचिवांच्या मार्फत मला वेळोवेळी महासभेच्या कामकाजाच्या सूचना दिल्या जात होत्या. ठरल्याप्रमाणे मला माझ्या कामाचा मोबदला मिळायला हवा. या संदर्भात महापौर, आयुक्त व विरोधी पक्षनेते आदींना पत्र दिले आहे.
- संजय पाटील,
तक्रारदार, लघुलेखक