नवी मुंबई : परिवहनच्या ताफ्यात सामील झालेल्या ‘तेजस्विनी’ बसची चावी महिला बसचालकाच्या हाती देण्यात आली आहे. महिला दिनाचे औचित्य साधून प्रशासनातर्फे या महिला चालक बसचा शुभारंभ करण्यात आला.महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात महिलांसाठी आरक्षित असलेल्या दहा नव्या तेजस्विनी बसचाही समावेश झाला आहे. या बसचे चालक, वाहक व प्रवासी महिलाच असणार आहेत. तर गर्दीची वेळ वगळता पुरुष प्रवाशांनाही त्यातून प्रवास करण्याची मुभा दिली जाणार आहे. या दहा बससाठी राज्य शासनाने अडीच कोटींचा तर पालिकेने ५० लाखांचा निधी दिलेला आहे. मात्र, परिवहन उपक्रमाकडे सध्या दोनच महिला चालक असल्याने तूर्तास केवळ एकच तेजस्विनी रस्त्यावर धावण्यासाठी काढली आहे. त्याचा शुभारंभ शुक्रवारी वाशी डेपोत करण्यात आला. या प्रसंगी महापौर जयवंत सुतार, आमदार मंदा म्हात्रे, आमदार संदीप नाईक, पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., परिवहन सभापती रामचंद्र दळवी आदी उपस्थित होते. ज्या मार्गावर महिला प्रवासी जास्त आहेत, त्या मार्गावर या बस चालवल्या जाणार आहेत. तर दहा गाड्यांसाठी आवश्यक चालक व वाहक महिलांची नियुक्ती झाल्यानंतर सर्वच बस महिलांच्या सेवेसाठी धावणार आहेत.या तेजस्विनीच्या उद्घाटन प्रसंगी आयटीएमएस प्रकल्पातील ई-तिकीट अॅपचे व स्मार्ट कार्ड योजनेचाही शुभारंभ करण्यात आला. हे स्मार्ट कार्ड प्रवाशांना बहु-उपयोगी असणार आहे.>उपमहापौरांना डावललेमहिला दिनाचे औचित्य साधून वाशीत तेजस्विनी बसचा शुभारंभ करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमास उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांना आमंत्रण देण्याचा विसर अधिकाऱ्यांना पडला. महिला दिनाच्या दिवशीच महिलेला डावलले असल्याने म्हात्रे यांनीही प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
‘तेजस्विनी’ची चावी महिलेच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 11:35 PM