दिवाळीमध्ये शहरात आगीच्या १५ घटना, अग्निशमन दलावरील ताण वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 02:46 AM2017-10-22T02:46:00+5:302017-10-22T02:46:05+5:30
दिवाळीच्या चार दिवसांमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये आग लागल्याच्या तब्बल १५ घटना घडल्या आहेत. उद्योजकांसह किरकोळ दुकानदार व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अग्निशमनविषयी उपाययोजना फक्त नावालाच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
नवी मुंबई : दिवाळीच्या चार दिवसांमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये आग लागल्याच्या तब्बल १५ घटना घडल्या आहेत. उद्योजकांसह किरकोळ दुकानदार व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अग्निशमनविषयी उपाययोजना फक्त नावालाच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नागरिकांमधील उदासीनतेमुळे अग्निशमन दलावरील ताण वाढू लागला आहे.
नेरुळ सेक्टर २८ मधील सद्गुरू अपार्टमेंटच्या समोरील झोपडपट्टीमध्ये १७ आॅक्टोबरला फटाक्यांमुळे आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन आग नियंत्रणामध्ये आणली. सीवूड सेक्टर ४२ ए गणपती अपार्टमेंटच्या समोरील झोपड्यांनाही दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आग लागली. याच दिवशी तुर्भे एमआयडीसीमधील मॅकेमको कंपनीलाही आग लागली. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास कंपनीमध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते. ठिणगीमुळे कंपनीमधील केमिकलने पेट घेतला. केमिकलचा स्फोट झाल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तीन तासांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणामध्ये आणली. वास्तविक कंपनीमध्ये वेल्डिंग व इतर कामे करत असताना आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक होते. केमिकल कंपनीमध्ये विशेष दक्ष असणे आवश्यक असते; परंतु योग्य काळजी घेतली गेली नसल्याने करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग नक्की कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने या घटनेमध्ये कंपनीमधील एकही कामगार गंभीर जखमी झालेला नाही. सर्वांना वेळेत घराबाहेर काढण्यात यश मिळविले. या घटनेमुळे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अग्निशमन दलावरील ताण वाढला व सर्व अग्निशमन कर्मचाºयांना पुढील चार दिवस दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जुईनगर सेक्टर २४ मधील सुंदरम सोसायटीच्या तिसºया मजल्यावर शुक्रवारी आग लागली. पेट्रोल पंपाजवळच आग लागल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रॉकेटमुळे ही आग लागल्याचा अंदाज रहिवाशांनी व्यक्त केला. आग लागताच परिसरामध्ये बघ्याची गर्दी जमली होती. विजय साळे व विनोद लोखंडे व सोसायटीमधील नागरिकांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून आग नियंत्रणामध्ये आणली. तुर्भे सेक्टर २३ मधील जनता मार्केटमध्येही १९ आॅक्टोबरला दुकानांना आग लागली होती. महादेव कलेक्शन या कपड्यांच्या दुकानांना पहाटे ५ वाजताच आग लागली. ही आगही फटाक्यांमुळे लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईमध्ये पाच दिवसांमध्ये तब्बल १५ ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये सर्वाधिक ७ घटना वाशी परिसरामध्ये घडल्या आहेत. यानंतर ५ घटना नेरुळ अग्निशमन दलाच्या कार्यक्षेत्रामध्ये घडल्या असून, तीन घटना ऐरोलीच्या कार्यक्षेत्रामध्ये घडल्याची नोंद झाली आहे.
आग वेळेत नियंत्रणामध्ये आणण्यात यश आले आहे. करोडो रुपयांचे नुकसान झाले असले तरी जीवितहानी व कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.
>नियम तोडणाºयांवर कारवाई नाही
शहरातील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटी, व्यावसायिक दुकान व एमआयडीसीतील कंपन्यांना अग्निशमनविषयी उपाययोजना करणे आवश्यक आहे. याविषयी नियमित पाहणी करून तसा अग्निशनचा ना हरकत दाखला घेणेही आवश्यक असते; परंतु कोणीही गांभीर्याने अग्निशमनचे नियम पाळत नाही व नियम तोडणाºयांवर प्रशासनाकडूनही काहीच कारवाई केली जात नाही.
दिवाळीमध्ये लागलेल्या काही महत्त्वाच्या घटना
तुर्भे एमआयडीसीमधील मॅकेमको कंपनीला आग लागून करोडो रूपयांचे नुकसान
नेरूळ सेक्टर २८ मधील सद्गुरू अपार्टमेंटसमोरील झोपड्यांना आग
नेरूळ सेक्टर १० मधील पंचशील अपार्टमेंटसमोर गाडीला आग
सीवूड सेक्टर ४२ मधील गणपती अपार्टमेंटसमोरील झोपड्यांना आग
जुईनगर सेक्टर २४ मधील सुंदरम सोसायटीच्या तिसºया मजल्यावरील घरामध्ये आग
तुर्भे सेक्टर २३ मधील महादेव कलेक्शन या कपड्याच्या दुकाना आग लागली.