नवी मुंबई : मनसेच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्ताने वाशीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्यांदाच मुंबईबाहेर पक्षाचा वर्धापन दिनाचा मेळावा होत असून त्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेचे इतरही नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये पक्षाची शॅडो कॅबिनेट घोषित होणार असून, त्यांच्यावर राज्य सकारच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवण्याचे काम सोपविले जाणार आहे.
नवी मुंबईत महापालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच मनसेचा वर्धापन दिनाचा मेळावा सोमवारी वाशीत होत आहे. वर्धापन दिनाचे आजवरचे प्रत्येक मेळावे मुंबईत झाले असून, पहिल्यांदाच मुंबईबाहेर नवी मुंबईत मेळावा घेतला जात आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून विरोधकांवर तोफ डागली जाण्याची शक्यता आहे. तर काही दिवसांपूर्वीच सानपाडा येथील एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी तशा प्रकारचा इशाराही दिला होता. यामुळे वर्धापन दिनाच्या मेळाव्यात ठाकरे यांच्याकडून नवी मुंबई महापालिका निवडणूक लढवण्याची घोषणाही होण्याची शक्यता आहे. या मेळाव्यास राज्यभरातून सहा हजारांहून अधिक मनसैनिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या वेळी राज ठाकरे यांच्याकडून पक्षाची शॅडो कॅबिनेट जाहीर केली जाणार आहे. त्यामध्ये ३० ते ४० जाणांचा समावेश असण्याची शक्यता आहे. मनसेची ही शॅडो कॅबिनेट सरकारच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवून राहणार आहे. त्या माध्यमातून सरकारला पावलोपावली कोंडीत पकडण्याचा प्रयत्न यापुढे मनसेचा राहणार असल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान, वर्धापन दिनाच्या निमित्ताने होत असलेल्या या मेळाव्यामुळे नवी मुंबईच्या मनसैनिकांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यापैकी अनेक जण पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत.