एपीएमसीमध्ये टोमॅटो चोरी करणारास अटक; १०० किलो टाेमॅटो केले लंपास
By नामदेव मोरे | Published: July 28, 2023 06:29 PM2023-07-28T18:29:03+5:302023-07-28T18:29:13+5:30
टोमॅटोचे दर वाढल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चोरीचे प्रमाण वाढू लागले आहे.
नवी मुंबई: टोमॅटोचे दर वाढल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चोरीचे प्रमाण वाढू लागले आहे. १२ जुलैला मार्केटमध्ये १० हजार रुपये किमतीचे १०० किलो टोमॅटो चोरीला गेले होते. सीसीटीव्हीच्या आधारे गुरूवारी संशयीतास ताब्यात घेण्यात आले आहे.
बाजार समितीच्या डी विंगमध्ये प्रल्हाद सोनकर यांचा टाेमॅटोचा व्यवसाय आहे. पहाटे तीन ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत येथे व्यापार केल्यानंतर शिल्लक माल गाळ्यात क्रेटमध्ये ठेवण्यात येतो. १२ जुलैला त्यांच्या गाळ्यात २४ कॅरेट टोमॅटो ठेवला होता. यामधील १०० किलो माल चोरट्यांनी चोरून नेला होता. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चोरी करणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्र दिसत होते. २७ जुलैला पहाटे चोरी करणारी व्यक्ती गाळ्याजवळ दिसली असताना सोनकर यांनी त्यांना थांबवून नाव विचारले असता त्याचे नाव ऋषी तुरा असून गाळा क्रमांक ५८३ मध्ये वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले. त्याला व्यापाऱ्यांनी ताब्यात घेऊन मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सीसीटीव्हीमध्ये चोरी करत असलेली व्यक्ती हीच असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात १० हजार रुपयांचे टोमॅटो चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मार्केटमध्ये चोरीच्या घटना होऊ नयेत यासाठी बाजार समिती प्रशासनाने साध्या वेशातील सुरक्षा रक्षकांची गस्त वाढविली असून व्यापाऱ्यांनाही सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.