रेल्वे स्थानकांच्या हस्तांतराचा प्रश्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 01:12 AM2019-04-12T01:12:53+5:302019-04-12T01:13:04+5:30

नवी मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या विषयाचा लोकमतने घेतलेला आढावा

transfer of railway stations question remains | रेल्वे स्थानकांच्या हस्तांतराचा प्रश्न!

रेल्वे स्थानकांच्या हस्तांतराचा प्रश्न!

Next

योगेश पिंगळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात हार्बर मार्गावर अत्याधुनिक रेल्वेस्थानके निर्माण करण्यात आली आहेत. रेल्वेस्थानकांमध्ये उभारलेल्या व्यावसायिक गाळ्यांचा आर्थिक फायदा सिडकोला मिळाला आहे. ही स्थानके रेल्वेकडे हस्तांतरित झाल्यास देखभाल दुरुस्तीचा खर्च रेल्वे प्रशासनाला करावा लागणार आहे. हा तिढा सुटत नसल्याने अनेक वर्षांपासून स्थानकांचे हस्तांतर रखडले आहे.


मुंबईतील वाढत्या लोकसंख्येला पर्याय म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यात आली. या शहरातील नागरिकांना दळणवळणाची सुविधा देण्याच्या दृष्टीने सिडको आणि रेल्वे प्रशासन यांनी संयुक्तरीत्या शहरात रेल्वे सुविधा सुरू केली. यामध्ये सिडकोने रेल्वेस्थानकांची आणि स्थानकांमधील पायाभूत सुविधांची पूर्तता केली असून रेल्वे मार्ग, सिग्नल यंत्रणा आदी सर्वच कामे रेल्वेने केली आहेत. यात ट्रान्सहार्बरसह नव्याने सुरू करण्यात आलेल्या खारकोपरपर्यंतच्या मार्गाचाही समावेश आहे.


शहरातील रेल्वेस्थानकांची देखभाल दुरु स्ती करण्याची जबाबदारी सिडकोची असली तरी त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सर्वच रेल्वेस्थानकांत सिडकोने व्यावसायिक कार्यालये बांधली आहेत. मात्र, देखभाल दुरुस्तीअभावी वाशी आणि सीबीडी रेल्वेस्थानकांना गळती लागली आहे. गळती होणारे सांडपाणी थेट फलाटांवर पडते. अनेक पाणपोई बंद आहेत. काही ठिकाणी नळ गायब आहेत. रेल्वेस्थानकांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.


अत्याधुनिक रेल्वेस्थानके म्हणून नावलौकिक मिळविलेल्या स्थानकांची अग्निसुरक्षा बंद आहे. येथील स्वच्छतागृहांचीही दुरवस्था झाली आहे. वाशी ते बेलापूरपर्यंतच्या स्थानकात दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवण्यात आल्या नाहीत, त्यामुळे त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. स्थानक परिसरात उभारलेले कारंजे बंद आहेत. बहुतांश ठिकाणी पंखे नादुरुस्त आहेत. स्थानकांवर सुरक्षा यंत्रणेचा अभाव असल्याने फेरीवाले स्थानकात आणि प्रवेशद्वारावरच व्यवसाय थाटत आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांची गैरसोय होत आहे.


रेल्वे प्रशासन आणि सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई शहरातील रेल्वेस्थानकांची निर्मिती करण्यात आली आहे. आहे. मात्र, अनेक वर्षांपासून हस्तांतराचा प्रश्न प्रलंबित असल्याने देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. याचा नाहक त्रास शहरातील रेल्व प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

देखभाल दुरुस्तीअभावी प्रवाशांची गैरसोय
रेल्वेस्थानकांतील सोयी-सुविधा, देखभालीची जबाबदारी सिडकाची आहे. स्थानकांतील व्यावसायिक गाळ्यांचा आर्थिक फायदा करून घेतल्याने हस्तांतरित करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. सिडको आणि रेल्वे प्रशासन यांनी वाद मिटवून प्रवाशांना सुविधा देण्यात यावी.
- अभिजित धुरट, अध्यक्ष,
नवी मुंबई रेल्वे प्रवासी वेल्फेअर असो.

२१ व्या शतकातील शहराला साजेशी रेल्वेस्थानके नवी मुंबई शहरात बांधण्यात आली आहेत; परंतु स्थानकांमध्ये अनेक सुविधा देखभाल दुरु स्तीच्या कारणांवरून बंद पडलेल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सिडकोने या सुविधा सुरू कराव्यात आणि प्रवासी नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी.
- विजय पाटील, रेल्वे प्रवासी

श्रेयवादात अडकले बोनकोडे रेल्वेस्थानक
दिघा आणि बोनकोडे भागातील स्थानिक आणि एमआयडीसी भागात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने दोन नवीन रेल्वेस्थानके मंजूर करण्यात आली होती. रेल्वेस्थानके निर्माण करण्यासाठी २०१३ साली सर्व्हेदेखील करण्यात आला होता. यापैकी दिघा स्थानकाचे काम सुरू झाले आहे; परंतु राजकीय श्रेयवादापोटी अद्याप बोनकोडे रेल्वेस्थानकाचे काम सुरू झाले नसून प्रवाशांची गैरसोय सुरूच आहे.

Web Title: transfer of railway stations question remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :localलोकल