लॉकडाऊनमधील बेरोजगारीने बनवले गुन्हेगार; बँक लुटणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:22 AM2020-07-19T00:22:30+5:302020-07-19T00:23:29+5:30
कोपरखैरणेतील घटना
नवी मुंबई : कोपरखैरणे येथील सारस्वत बँकेवर दरोडा टाकल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चेंबूर परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. दोघेही लॉकडाऊनमुळे आलेल्या बेरोजगारीने त्रस्त होते. यातूनच त्यांनी हा कट रचला. न्यायालयाने दोघांनाही २३ जुलै पर्यंतची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती माहिती उपायुक्त पंकज डहाणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
स्वप्निल सपकाळ (१८) आणि भूषण चौधरी (२६) अशी त्यांची नावे असून, ते चेंबूरचे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला सुरा, बनावट बंदूक व ६८ हजार रुपयांची रोकड जप्त केली. गुरुवारी दुपारी कोपरखैरणे सेक्टर १९ येथील सारस्वत बँकेवर दरोडा पडल्याची घटना घडली होती. बँकेत आलेल्या अज्ञात दोघांनी बँकेचे मॅनेजर व कर्मचाऱ्यांना चाकू व पिस्तुलाचा धाक दाखवून लॉकररूममधील सुमारे साडेचार लाखांची रोकड लुटली होती. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती.
तपासादरम्यान सीसीटीव्हीमधून संशयितांची माहिती समोर आली होती. त्याद्वारे गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत जगदाळे, निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी तपासपथके तयार केली होती. त्यामध्ये सहायक निरीक्षक वसीम शेख, प्रवीण पांडे, उपनिरीक्षक सम्राट वाघ, मनोज महाडिक, हवालदार जितेंद्र पाटील, प्रकाश देशमुख दिलीप मिणमिने, पोलीस नाईक विकास निकम, अमित तडवी आदींचा समावेश होता. पोलिसांनी तांत्रिक तपासावर जोर दिला. सहायक निरीक्षक वसीम शेख यांना चेंबूर येथे संशयित गुन्हेगार लपले असल्याची माहिती मिळाली. यानुसार, शुक्रवारी रात्री उशिरा पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला तेव्हा दोघेजण हाती लागले.