प्राची सोनवणेनवी मुंबई : शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा प्रकार म्हणजे सायकलिंग. सर्वच क्षेत्रात महिला यशाची शिखरे गाठत असून पनवेलच्या प्रिसीलीया मदनचा (२३) सायकल प्रवास हा प्रत्येकाला थक्क करणारा आहे. पनवेल ते कन्याकुमारी असे १८ हजार किमीचे अंतर प्रिसीलीयाने अवघ्या १९ दिवसांत पार केले.ट्रेकिंग, सायकलिंगची आवड असलेल्या प्रिसीलीयाला आपला छंद जोपासण्यासाठी लहानपणापासून पालकांनी प्रोत्साहन दिलं. अभ्यासात अव्वल असलेल्या प्रिसीलीयाने एमएस्सी (कॉम्युटर सायन्स) शिक्षण घेतलं आहे. आतापर्यंत प्रिसीलीयाने मनाली ते खारदुंग (लडाख) २०१२ मध्ये, पनवेल ते कोणार्क (ओडिशा) असा २००० किमीचा प्रवास सायकलिंगद्वारे २०१५ मध्ये पूर्ण केला होता. या सर्वच प्रवासांमध्ये वडील धनंजय मदन तिच्यासोबत होते. मात्र २०१६ मध्ये केलेल्या पनवेल ते कन्याकुमारी प्रवास मात्र तिने एकटीने केला. प्रिसीलीया सांगते की, महाराष्ट्रातील सहा दिवसांच्या भटकंतीत ओळखीच्या लोकांकडे राहिल्यानंतर गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूतील तिचे सारे मुक्काम हे अनोळखी लोकांकडेच होते.धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकाने स्वत:चा शोध घेण्यासाठी एखादा प्लॅन आखणे गरजेचे आहे. सध्या आयटी क्षेत्रात नोकरी करणारी प्रिसीलीया सायकलिंगमध्ये मात्र खंड पडू देत नाही. प्रत्येक मुलीने आयुष्यात एकदा तरी साहसी खेळाचा अनुभव घेतलाच पाहिजे असा मोलाचा संदेश प्रिसीलीयाने दिला.
सायकलिंगची अनोखी भटकंती ठरली प्रेरणादायी , एकोणीस दिवसांत १८ हजार किलोमीटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:41 AM