वाहनचोर टोळीचा पोलिसांवर हल्ला, दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 02:45 AM2018-11-12T02:45:00+5:302018-11-12T02:45:15+5:30
नेरूळमधील प्रकार : चोरीच्या दोन मोटारसायकल जप्त; दोघांना केली अटक
नवी मुंबई : वाहनचोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुकलीला नेरूळ पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या वेळी झालेल्या झटापटीत चोरट्याने केलेल्या हल्ल्यात एक हवालदार जखमी आहे. दरम्यान, इतर पोलिसांनी धाडसाने एकाला पकडल्यानंतर त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली आहे.
नेरूळ येथील शनिमंदिर मार्गावर हा प्रकार घडला आहे. वाहनचोरीच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या टोळींच्या शोधासाठी नेरूळ पोलिसांनी ठिकठिकाणी सापळा रचला होता, त्यानुसार नेरूळ पोलीस ठाण्याचे हवालदार चंद्रकांत कदम व वाघ हे शनिमंदिरालगत बंदोबस्तावर होते. मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांच्या शेजारी तिघे जण उभे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानुसार कदम यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांची चौकशी केली असता, एका चोरट्याने कारचे लॉक तोडण्यासाठी सोबत आणलेला स्क्रू ड्रायवर त्यांच्या डोळ्यावर मारला. त्यानंतर तिघेही पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना कदम व वाघ यांनी धाडसाने झटापट करून एकाला पकडले.
चौकशीदरम्यान त्याच्या दुसऱ्या साथीदारालाही पोलिसांनी सापळा रचून अटक केली. हेमंत कुमार (२५) व जयसवंत सिंग (२७) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.