- प्रशांत शेडगे, पनवेल
शहरातील सिडको वसाहतींचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असला तरी आजूबाजूला असलेली गावे मात्र चाळीस वर्षांनंतरही पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, गटारांबाबत समस्या ग्रामस्थांना सतावत आहेत. सिडकोने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आजतागायत झाली नाही. पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर मात्र गावांची वणवण संपेल, असा विश्वास ग्रामस्थांना वाटत आहे. सिडकोने १९७0 साली पनवेल परिसरातील जमिनी प्रकल्पग्रस्तांकडून कवडीमोल भावाने संपादित केल्या. यावेळी सिडकोकडून रस्ते, पाणी, मैदाने, व्यायामशाळा, उद्याने, शौचालये, अंतर्गत पथदिवे, गटारे अशा पायाभूत सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्यांनी पूर्तता झालेली नाही. गावांचा नियोजित विकास होणार!प्रस्तावित महानगरपालिकेत एकूण ७0 गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. या गावांमध्ये नागरीकरण पोहचले आहे. इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. मात्र योग्य नियोजनाअभावी ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्था व घनकचरा व्यवस्थापनाच्या नियोजनाअभावी गावाला भकासपणा आला आहे. महानगरपालिका झाल्यानंतर या गावांचा विकास होण्यास नक्कीच मदत होईल, असे मत जाणकार व्यक्ती मांडत आहेत.सिडकोने विविध प्रकल्पांकरिता बैठका घेतल्या तेव्हा प्रलंबित प्रश्न उपस्थित केले. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रोडपाली ग्रामस्थ आत्माराम पाटील यांनी केला आहे.कामोठेतील सांडपाण्याची समस्या गंभीर आहे. महानगरपालिका झाली तर कामोठे, नौपाडा, जुई या गावांचा विकास होईल, असा विश्वास राकेश गोवारी यांनी व्यक्त केला.खारघरचा सायबर सिटी म्हणून विकास केला तरी आजूबाजूच्या गावांची काय परिस्थिती आहे याबाबत ऊहापोह झाला नसल्याची खंत शिरीष घरत यांनी व्यक्त केली. आदईतील तलावाचे सुशोभीकरण, ड्रेनेज जोडणी आणि रस्त्याकरिता ग्रामपंचायतीने आर्थिक सहाय्याची मागणी केली होती. मात्र सिडकोने एक दमडीही दिली नसल्याचे सरपंच रूपाली शेळके यांनी सांगितले. कळंबोलीत ग्रामपंचायतीला कचरा महामार्गालगत टाकावा लागतोय. महापालिका झाली तर गावठाणाचा प्रश्न निकाली निघेल, असा विश्वास अरविंद कडव यांनी व्यक्त केला. कळंबोलीतील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही चक्क फसवणूक असल्याची संतप्त प्रतिक्रिया कळंबोलीचे माजी सरपंच विजय खानावकर यांनी दिली. वळवली- टेंभोडेत सेझ उभारण्याचा घाट घातला होता. महानगरपालिका झाली तर गावांचा विकास होईल, अशी प्रतिक्रि या माजी सरपंच मंजुळा नाथा म्हसकर यांनी दिली.पनवेल महानगरपालिका झाली तर किमान आजूबाजूच्या गावांमध्ये शहरीकरण होईल, असा विश्वास भरत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर तळोजा पाचनंदमध्येही अनेक पायाभूत सुविधांची वानवा आहे.