प्रबळगडला वर्षात १८ हजार पर्यटकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:03 AM2020-02-15T00:03:17+5:302020-02-15T00:03:51+5:30

स्थानिकांना उपलब्ध झाला रोजगार : संयुक्त वनसमितीमुळे पर्यटनवृद्धीस चालना; उपक्रमाचे होत आहे कौतुक

Visit to Prabalgarh 3,000 tourists a year | प्रबळगडला वर्षात १८ हजार पर्यटकांची भेट

प्रबळगडला वर्षात १८ हजार पर्यटकांची भेट

Next

नामदेव मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पनवेल तालुक्यामधील कलावंतीन व प्रबळगड किल्ला देश-विदेशातील ट्रेकर्सना आकर्षित करत आहे. डिसेंबर २०१८ पासून १४ महिन्यांमध्ये तब्बल १८ हजार ९५ पर्यटकांनी गडास भेट दिली आहे. संयुक्त वनसमितीच्या प्रबळगड पॅटर्नमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. गावची अर्थव्यवस्था पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून असून, वनव्यवस्थापन समितीमधील तरुण पर्यटकांच्या सुरक्षेचीही काळजी घेऊ लागले आहेत.


गड-किल्ले ही महाराष्ट्राची खरी ऐतिहासिक संपत्ती. ही संपत्ती रायगड जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लाभली आहे. गिरीदुर्ग ते जलदुर्गांपर्यंत अनेक महत्त्वाचे किल्ले या परिसरामध्ये आहेत. पनवेल परिसरामधील कलावंतीन व प्रबळगड किल्ल्याकडेही पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. कलावंतीन गडाचा आकाशाला भिडणारा सरळ सुळका व खडकात कोरलेल्या पायऱ्या देश-विदेशातील ट्रेकर्सना आकर्षित करू लागल्या आहेत. या परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी वनविभागाने डिसेंबर २०१८ मध्ये प्रयत्न सुरू केले. संयुक्त वनव्यवस्थापन समिती स्थापन करून त्यामध्ये माची-प्रबळ गावामधील स्थानिक तरुणांना सहभागी करून घेतले. ४३ तरुणांना या माध्यमातून हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. जवळपास प्रत्येक घरातील एक व्यक्ती या माध्यमातून पर्यटनवृद्धीसाठी सहकार्य करू लागला आहे. गडाच्या पायथ्यापासून ते शिखरापर्यंत आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करण्यास सुरुवात केली आहे. पर्यटकांना गडाकडे जाताना मद्य घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. पर्यटकांची नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. गडाच्या सुळक्यावर जाण्यासाठी रस्सी बांधण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक उपलब्ध करून दिले आहेत. अपघात होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणीही स्वयंसेवक तैनात केले असून, ते पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेऊ लागले आहेत.


संयुक्त वन व्यवस्थापन समितीमुळे प्रत्येक महिन्याला किती पर्यटक येतात, याची माहितीही उपलब्ध होऊ लागली आहे. ६ डिसेंबर २०१८ पासून आतापर्यंत तब्बल १८ हजार ९५ पर्यटकांनी गडाला भेट दिली आहे. माची-प्रबळ गावातील संपूर्ण अर्थव्यवस्था आता पर्यटनावर अवंबून आहे. गावातील नागरिकांनी पायथ्यापासून ते प्रबळगडापर्यंत ठिकठिकाणी खाद्यपदार्थ, पाणी व लिंबू पाणी विकण्याचे स्टॉल सुरू केले आहेत. गावामध्ये हॉटेल व टेंटचा व्यवसायही उत्तमप्रकारे सुरू आहे. सुट्टीच्या दिवशी २०० पेक्षा जास्त टेंटला मागणी असते. गावामधील नागरिकांना आर्थिक स्तर वाढण्यासही मदत होऊ लागली आहे. गडावर चुकीचे प्रकार होणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. कचरा टाकण्यासाठी कुंड्या तयार करण्यात आल्या असून जमा झालेल्या कचºयाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे. पर्यटनवृद्धीच्या प्रबळगड पॅटर्नची आता जिल्हाभर चर्चा सुरू झाली आहे.

वनसमितीचे कार्य
संयुक्त वनसमितीच्या माध्यमातून येणाºया पर्यटकांची नोंद करणे, पर्यटकांना गाइड उपलब्ध करून देणे व इतर कामे केली जात आहेत. अपघातजन्य ठिकाणी स्वयंसेवक उपलब्ध करून दिला जात आहे. आवश्यक त्या ठिकाणी कचराकुंड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये सुभाष राठोड वनसमितीचे सचिव म्हणून काम करत आहेत. प्रवीण जैस्वाल हे वनरक्षकही कार्यरत असून अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावर स्थानिक नागरिकांची नियुक्ती केलेली आहे.

Web Title: Visit to Prabalgarh 3,000 tourists a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.