आम्हाला थ्री जी, फोरजी नको, केवळ पाणी आणि वीज द्या; आदिवासी बांधवांची खदखद
By वैभव गायकर | Published: April 5, 2024 06:42 PM2024-04-05T18:42:07+5:302024-04-05T18:42:35+5:30
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर आदिवासी वाड्यातील बांधवांची खदखद
वैभव गायकर
पनवेल : 18 व्या लोकसभेचे 543 सदस्य निवडण्यासाठी भारतात 19 एप्रिल 2024 ते 1 जून 2024 या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.याकरिता देशभरात वातावरण ढवळून निघत आहे.सत्ताधारी विरोधात एकमेकांवर कुरघोड्या करीत आहेत.विकसित भारत,डिजिटल भारत,तसेच विश्वगुरू भारताचे स्वप्न दाखवले जात असताना आजही पनवेल मधील असंख्य आदिवासी वाड्यामध्ये वीज आणि पाणी अशा मुलभूत सुविधा पोहचलेल्या नाहीत.
या आदिवासी बांधवाना देश अमृत महोत्सवी वर्ष साजरा करीत असताना आपल्या मूलभूत प्रश्नांसाठी झगडावे लागत आहे.पनवेल तालुक्यात 70 पेक्षा जास्त आदिवासी वाड्या आहेत.अनेक आदिवासी वाड्या या मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत.यांपैकीच घेरावाडी मध्ये अद्याप वीजही नाही.निवडणुकीच्या काळात सर्वपक्षीय नेते मोठ मोठे आश्वासन देतात.मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष उलटून गेल्यानंतरही अद्याप एखाद्या वाडीत वीज पोहचलेली नसल्याची शोकांतिका असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकुर यांनी सांगितले.पनवेल मध्ये आंतराष्ट्रीय विमानतळ येऊ घातला आहे.पुढील वर्षी याठिकाणाहून विमानही उडणार आहे.शासनाने त्यादृष्टीने युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली आहे.मात्र एखाद्या वाडीत 70 वर्ष वीज नाही याबाबत प्रशासन एवढं सुस्त कस ? शासन,प्रशासनाला याबबत कोणतीच सोसर सुतक नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.घेरावाडीत 29 कुटुंब वास्तव्यास आहेत.शेकडो रहिवासी याठिकाणी राहत आहेत.प्रस्थापितांना घाबरून आदिवासी बांधव उघडपणे आपल्या समस्यावर बोलायला घाबरत आहेत.
रस्ते,पाणी आणि वीज अशा पायाभूत सुविधांपासून घेरावाडी मधील आदिवासी बांधव वंचित आहेत.तर याच परिसरातील कोरलवाडीत देखील रस्ते आणि पाण्याची बोंब आहे.दोन्हीहि ग्रामपंचायती आपटा ग्रामपंचायती हद्दीत येतात.
प्रतिक्रिया -
पनवेल मधील अनेक आदिवासी वाड्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.घेरावाडीत अद्याप वीज पोहचलेली नाही.हि दुर्दैवाची बाब असून केवळ निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय नेत्यांची पाऊले आदिवासी वाड्यांकडे वळतात.
- संतोष ठाकुर (सामाजिक कार्यकर्ते,पनवेल)