महिला दिन आणि आर्थिक नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 12:37 AM2019-03-08T00:37:33+5:302019-03-08T01:03:31+5:30
स्त्रियांना प्रोत्साहित करणारे वर्तन, त्यांचा जीवनस्तर उंचावण्याकडे दुर्लक्ष करण्यापासून ते त्यांचा छळ आणि अत्याचार करण्यापर्यंत अनेक प्रकारे हीनत्वाची वागणूक स्त्रीजातीला मिळत राहिली आहे.
- विलास पंढरी
मानवसमूहात स्त्रीजातीचा जवळपास निम्मा हिस्सा आहे. स्त्रियांना प्रोत्साहित करणारे वर्तन, त्यांचा जीवनस्तर उंचावण्याकडे दुर्लक्ष करण्यापासून ते त्यांचा छळ आणि अत्याचार करण्यापर्यंत अनेक प्रकारे हीनत्वाची वागणूक स्त्रीजातीला मिळत राहिली आहे. हा भेदभाव दूर करून स्त्रियांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती आणि त्याचे सुचालन करणे आणि लैंगिक समतेद्वारे (जेंडर इक्वॅलिटी) समाजाचे संतुलन साधणे यासाठी पुरोगामी आणि विवेकी समाजाने बाळगलेला दृष्टिकोन, केलेली कृती यांचा समुच्चय म्हणजे स्त्री सक्षमीकरण, असे थोडक्यात म्हणता येईल.
स्त्रि यांच्या हक्कांविषयी अनेक आंतरराष्ट्रीय करारांत मान्यता मिळूनही, स्त्रिया निर्धन आणि निरक्षर राहण्याचे प्रमाण मोठे आहे. वैद्यकीय सुविधा, मालमत्तेची मालकी, पतपुरवठा, प्रशिक्षण आणि रोजगारात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी संधी मिळते. त्या पुरुषांच्या तुलनेत राजकीयदृष्ट्या सक्रि य असण्याची शक्यता फारच कमी आहे आणि त्या घरगुती हिंसाचाराचा बळी होण्याची शक्यता खूपच मोठी आहे. स्त्रियांची मानसिकता बदलणे अतिशय महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात स्त्रिया अजूनही स्वत: निर्णय घेऊ शकत नाहीत. इथे त्या पुरुषांच्या निर्णयावर अवलंबून राहतात. त्यांची निर्णय क्षमता वाढणे गरजेचे आहे. घटनेने अनेक अधिकार दिलेले आहेत, याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, प्रबोधन झाले पाहिजे. ती अजूनही १00 टक्के सक्षम आहे, हे आपण मान्य करू शकत नाही. ‘ग्लोबल वर्ल्ड वेज’ रिपोर्टनुसार भारतीय महिला व पुरुष यांच्या वेतनात खूपच तफावत आहे. ग्लोबल इकॉनॉमिक फोरमच्या ‘जेंडर गॅप’ अहवालानुसार, पुरुष-महिला समानतेच्या बाबतीत जगभरातील १५० देशांमध्ये भारत १०८ व्या स्थानावर आहे. देशात सर्वात वरच्या स्तरावर असलेल्या हुद्द्यांवरील महिलांची संख्या केवळ पाच टक्के आहे. भारतातील साधारणपणे २० टक्के कंपन्यांमध्ये संचालकपदावर एकही महिला नाही. दुसरे असे की, पुरुषांच्या तुलनेत महिला कमी वर्षे काम करतात. मुलांचा जन्म आणि संगोपन यासाठी बहुतेक महिला करिअरमध्ये काही महिने अथवा काही वर्षे ‘ब्रेक’ घेतात. पुन्हा कामावर रुजू झाल्यावर मात्र त्यांना काम सोडताना असणाऱ्या वेतनापेक्षा कमी वेतनावर रुजू व्हावे लागते, असे काही वेळा दिसून येते. उच्च स्तरावरील स्त्रियांची आयकॉन असलेल्या चंदा कोचर भ्रष्टाचाराच्या कचाट्यात अडकल्याने वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे.
आज जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा केला जात आहे. स्त्री काटकसरीने संसार करते हे सिद्ध होऊनही बहुतेक कुटुंबांमध्ये आजही आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक हा विषय पुरुषांच्या अखत्यारीत येतो. महिलेने अविवाहित राहायचे ठरविले किंवा लग्नानंतर घटस्फोट झाला किंवा वैधव्य आले आणि त्यातच मुलांच्या संगोपनाची जबाबदारी पडली, तर संबंधित महिलेला खूप आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागते. आज देशभरात साधारण १० कोटींच्या वर
महिला घटस्फोट, वैधव्य किंवा लग्न न झाल्याने एकट्या राहात आहेत. महिलांसाठी सावित्रीबाई फुले योजना, मातृत्व अनुदान योजना, निराश्रित महिलांसाठी आधार, बालिका समृद्धी योजना, इंदिरा गांधी महिला संरक्षण योजना, देवदासी पुनर्वसन योजना, महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण योजना, सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना, महिला बचतगट अशा अनेक योजना सरकारने आणल्या आहेत.