उद्योजकांसाठी नाही, पालिकेसाठी काम करा
By admin | Published: May 3, 2016 01:04 AM2016-05-03T01:04:54+5:302016-05-03T01:04:54+5:30
एमआयडीसीमधील मालमत्ता कराची थकबाकी का वसूल केली नाही, उद्योजकांच्या युनियनसाठी काम करू नका, पालिकेसाठी काम करा, वातानुकूलित मुख्यालयात फाईलचे ढिगारे
नवी मुंबई : एमआयडीसीमधील मालमत्ता कराची थकबाकी का वसूल केली नाही, उद्योजकांच्या युनियनसाठी काम करू नका, पालिकेसाठी काम करा, वातानुकूलित मुख्यालयात फाईलचे ढिगारे लावून डम्पिंग ग्राऊंड करणे डोळ्यांना खटकत नाही का, अशा शब्दात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.
आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्यासाठी मुख्यालयात आलेल्या मुंढे यांनी थेट त्यांच्या दालनामध्ये न जाता तळमजल्यावरील लेखा व मालमत्ता कर विभागाला भेट दिली. कर्मचाऱ्यांना ते काय काम करत आहेत हे विचारून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तुमची वर्कशीट कुठे आहे असे विचारताच कर्मचारी निरुत्तर झाले. काय काम करणार याची स्पष्ट माहिती व तक्ता असलाच पाहिजे असे सर्वांना सांगितले. मालमत्ता कर विभागात कोपऱ्यामध्ये पडलेल्या फाईलच्या ढिगाऱ्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. भव्य मुख्यालय, सेंट्रल एसी व अत्याधुनिक सुविधा असताना अशाप्रकारे कार्यालयाचे डम्पिंग ग्राऊंड का केले आहे, कोपऱ्यातील फाईलचा ढिगारा डोळ्यांना खटकत नाही का असे कर्मचाऱ्यांना सुनावले. एमआयडीसीमधील कर वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुमचे उद्दिष्ट किती आहे, किती साध्य झाले व थकबाकी याविषयी माहिती विचारली. वर्षानुवर्षे उद्योजकांकडे कराची थकबाकी असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. करवसुलीला न्यायालय स्थगिती देत नसल्याचे स्पष्ट करताच उद्योजकांच्या युनियनचा विरोध होत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यामुळे संतापलेल्या मुंढे यांनी तुम्ही युनियनसाठी काम करता की पालिकेसाठी अशी विचारणा केली.
लेखा विभागामधील एक फाईल हातामध्ये घेवून आॅक्टोबरची ही फाईल डिसेंबरपर्यंत का निकाली लागली नव्हती, एवढा कालावधी का लागला अशी विचारणा केली. विधी विभागाच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी धारेवर धरले. प्रलंबित प्रकरणे वेळेत मार्गी लागली नसल्याविषयी नाराजी व्यक्त केली. मुख्यालयामध्ये फायर इस्टिंगविशर कोपऱ्यात ठेवल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. फायर इस्टिंगविशर कुठे आहे याविषयी सूचना फलक असला पाहिजे. सहजपणे तो घेता येईल अशा ठिकाणी ठेवला पाहिजे अशा सूचनाही त्यांनी केल्या. अतिक्रमण विभागामध्ये जावून कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी आयुक्तांच्या दालनामध्ये जावून पदभार स्वीकारला. विभाग प्रमुखांची बैठक घेवून प्रत्येक विभागाविषयी माहिती घेतली. पहिल्याच दिवशी अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतल्यामुळे दिवसभर सर्वच कर्मचारी शांतपणे कामात व्यस्त असल्याचे दिसत होते. अनेक कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदाच दिवसभर ओळखपत्र लावले होते. दुपारी जवळपास एक तास कँटीनमध्ये सुरू असलेला गोंधळही जाणवत नव्हता. (प्रतिनिधी)
वातानुकूलित यंत्रणेचीही उलटतपासणी
महापालिकेचे भव्य मुख्यालय व वातानुकूलित यंत्रणेविषयी आश्चर्याचे भाव आयुक्तांच्या चेहऱ्यावर दिसत होते. अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये विद्युत विभागाच्या अभियंत्यांना एसीचे कुलिंग मोजून दाखवा अशी विचारणा केल्याने अधिकाऱ्यांचीही धावपळ सुरू झाली, दालनाबाहेर येत माहिती घेऊन अधिकारी पुन्हा बैठकीत गेले.
राजकीय दबाव नाही
काम करताना राजकीय दबाव येण्याचा प्रश्न येत नाही. प्रशासनाचे प्रतिनिधित्व करताना कायद्याच्या चौकटीत राहून काम केले जाईल. जे नियमात बसते ते केले जाईल, जे नियमात बसणार नाही ते काम केले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ई - गव्हर्नंसवर भर
महापालिकेचा कारभार अधिक गतिशील करण्यासाठी ई-गव्हर्नंसवर अधिक लक्ष देणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. आरोग्य यंत्रणा, उत्पन्नवाढ, पाणीपुरवठा, स्वच्छता याकडे लक्ष केंद्रित केले जाईल. स्वतंत्र आयटी विभाग सुरू केला जाईल. ई - टपालपासून जास्तीत जास्त अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल.
नागरिकांच्या हिताला प्राधान्य
विकासकामे करताना नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्यात येईल. विकासकामे करताना संबंधित काम करणे आवश्यक आहे का, या कामासाठी पालिकेची आर्थिक स्थिती कशी आहे व या क्षणी ते काम करणे किती गरजेचे आहे हे तपासूनच कामे केली जातील. जनतेच्या पैशाचा जनतेसाठीच योग्य वापर केला जाईल.