एजन्सीअभावी रखडले विंधण विहिरींचे काम
By admin | Published: May 3, 2016 01:00 AM2016-05-03T01:00:26+5:302016-05-03T01:00:26+5:30
पनवेल तालुक्यातील अनेक गाव-पाडे पाणीटंचाईग्रस्त आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य आराखड्यामध्ये ३६ गावे आणि आदिवासी वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. गाव-वाड्यांवरील
पनवेल : पनवेल तालुक्यातील अनेक गाव-पाडे पाणीटंचाईग्रस्त आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य आराखड्यामध्ये ३६ गावे आणि आदिवासी वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. गाव-वाड्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहेत. पनवेल तालुक्यातील २ गावे आणि ११ वाडीतील १३ विंधण विहिरींना मंजुरी मिळाली आहे. मात्र त्या खोदण्याकरिता एजन्सीच मिळत नसल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून हे काम रखडले आहे.
उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत आहे. अनेक गाव-वाड्या पाण्यावाचून हैराण झाल्या आहेत. पनवेल तालुक्यात १३ विंधण विहिरींना मंजुरी दिली आहे. यासाठी जवळपास साडेचार लाखांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र मंजुरी मिळून एक महिना झाला तरी विंधण विहिरी खोदण्यास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आदिवासी वाडीतील नागरिक अद्याप तहानलेलेच आहेत. तालुक्यात पाणीटंचाईची समस्या मार्चपासून अधिक गंभीर झाली आहे. आदिवासी वाड्यांवरील महिलांना भर उन्हात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तलाव, नदीपात्र, नाले कोरडे पडल्याने दैनंदिन वापरासाठीही पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. (वार्ताहर)
प्रशासनाच्या पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात ३६ गावे आणि वाड्यांचा समावेश करण्यात आला. याशिवाय १३ विंधण विहिरींना मंजुरी देण्यात आलेली असून तालुक्यातील मालडुंगे येथील देहरंग व धोदाणी या दोन गावात तसेच बेलवाडी, गराडा, सावरमाळ, कामटवाडी, धामोळे, फणसवाडी, बुर्दुलवाडी, मोरबे आदिवासी वाडी, ठाकूरवाडी, भल्याची वाडी, पेरूची वाडी या गाव आणि वाड्यांमध्ये विंधण विहिरी खोदण्यात येणार आहेत. मात्र खोदकामासाठी पनवेलमध्ये महिनाभरापासून एजन्सी मिळत नसल्यामुळे काम रखडले आहे.
प्रशासनाने टंचाईवर मात करण्यासाठी १३ विंधण विहिरींना मंजुरी दिली आहे. मात्र या विहिरी खोदण्यासाठी एजन्सीच तयार होत नाही. आमचे प्रयत्न सुरू असून आठवड्याभरात विहिरींचे खोदकाम सुरू करण्यात येईल.
- रवींद्र चव्हाण,
अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पनवेल