नवी मुंबई : चीनमधून आलेला कोरोना व्हायरस (कोविड-१९) अनेक देशांमध्ये पोहोचला असून, अनेक ठिकाणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सोशल माध्यमांमार्फत अशा पसरल्या जाणाऱ्या अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोना व्हायरसबाबत पसरत असलेल्या अफवांचे निराकरण करण्यासाठी नेरूळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमध्ये डॉक्टरांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत नवी मुंबईतील ४० डॉक्टरांनी सहभाग घेतला होता.
कोरोना व्हायरस प्राण्यांपासून मनुष्यात व व्हायरसबाधित मनुष्यापासून निरोगी मनुष्यात हवेमार्फत पसरला जातो. या विषाणूसाठी कोणतीही लस अथवा औषध उपलब्ध नाही. कोरोना विषाणू हा प्राणीजन्य असूनही हा विषाणू नक्की कोणत्या प्राण्यांपासून होतो याबाबत माहिती उपलब्ध नाही. अचानक येणारा ताप, खोकला, घसा बसणे, दम लागणे व श्वास घेण्यास त्रास होणे अशी या आजाराची विविध लक्षणे आहेत. मुळात हा आजार बाधित असणाºया रुग्णांच्या खोकण्यामुळे हवेतून आजार पसरतो. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केले.
केरळ राज्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र उपचाराने ते बरे झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अशी माहिती या कार्यशाळेत देण्यात आली. नागरिकांनी प्रतिबंधक तत्त्वांचे पालन केले तर सद्य:स्थितीत हा आजार भारतात वेगाने पसरण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना व्हायरसबाबत महाराष्ट्र सरकारने नियोजित केलेल्या सुविधांची माहिती प्राध्यापिका डॉ. मिताली नाईक यांनी दिली. या कार्यशाळेत इन्फेक्शन कंट्रोल साहाय्यक डॉ. अनिला प्रबिल, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. आर. सरस्वती जयंती व डॉ. शालिनी गोरे, तेरणा हॉस्पिटलच्या क्षयरोग नियंत्रण विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. दीपिका उगाडे यांनी मार्गदर्शन केले.