नवी मुंबई : स्वच्छता म्हणजेच लक्ष्मी या भूमिकेतून आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वच्छतेला प्राधान्य देत दिवाळी साजरी करणाºया राजश्री मोरे कुटुंबीयांची महापालिकेने विशेष दखल घेतली आहे. कचºयालाच धन मानणाºया या कुटुंबाचा नवी मुंबईकरांनी आदर्श बाळगण्याची गरज असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
सीवूड - नेरूळ येथील आदर्श सोसायटीमधील राजश्री मोरे यांच्या स्वच्छता व पर्यावरणप्रेमी कुटुंबाने दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील जादुई खत टोपलीचे पणती लावून पूजन केले. याद्वारे त्यांनी स्वच्छतेचा एक आदर्श समाजाला घालून दिला आहे. मोरे या अनेक दिवसांपासून घरातील ओल्या कचºयाचे नियोजन करून जादुई खत टोपली वापरून त्याचे खतात रूपांतर करीत आहेत. या खताचा वापर बाल्कनीतील झाडांसाठी केला जात आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आजही अनेक ठिकाणी विशेषत: ग्रामीण भागात कचºयाला धन समजण्यात येते. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी उकिरड्यावर पणती लावून पूजन करण्याची परंपरा आजही ग्रामीण भागात दिसून येते. याचेच अनुकरण शहरातील काही संस्कृतीप्रिय कुटुंबाकडून केले जात आहे. कचºयाला पर्यावरणाचे धन समजून घरातील निर्माल्य, पाने, फुले, चिरलेल्या भाजीची देठे, बारीक केलेल्या फळांच्या साली असा विविध स्वरूपाचा ओला कचरा घरातल्या घरातच टोपलीत साठवून त्यापासून खतनिर्मिती केली जात आहे. या कचºयापासून निर्माण झालेल्या खताचा वापर गॅलरीतील घरगुती बाग फुलविण्यासाठी केला जात आहे. अशा पर्यावरणस्नेही मोरे कुटुंबीयांचा आदर्श प्रत्येक नागरिकाने नजरेसमोर ठेवल्यास नवी मुंबई शहर स्वच्छ व पर्यावरणपूरक राहण्यास मोलाची मदत होईल, असा विश्वास महापालिकेकडून व्यक्त करण्यात आला आहे.