नवी दिल्ली - वाढलेलं वय हे फक्त एक संख्या आहे. कारण, वद्धापकाळतही अद्वितीय कामगिरीच्या जोरावर तरुणाईला लाजवेल किंवा युवकांना प्रेरणा मिळेल असे रेकॉर्ड वयोवृद्धांकडून बनविले जातात. अशीच एक लक्षवेधी कामगिरी तब्बल 102 वर्षांच्या आजीबाई मन कौर यांनी केली आहे. वर्ल्ड मास्टर्स अॅथलिट चॅम्पियनशीपमध्ये या आजीबाईंनी देशासाठी सुवर्णपदक पटकावले आहे. विशेष, म्हणजे यापूर्वीही 2017 मध्ये मन कौर यांनी न्यूझिलंड येथील 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत गोल्ड मिळवले होते. सलग तिसऱ्या वर्षी आजीबाईंनी गोल्ड मिळवले आहे.
पंजामधील पटियाला येथे राहणाऱ्या मन कौर या 102 वर्षीय आजीबाईने सोनेरी कामगिरी केली आहे. स्पेनच्या मलागा येथील वर्ल्ड मास्टर्स अॅथलिट स्पर्धेत या आजीबाईनं सुवर्णपदकाची कमाई करत देशाची मान उंचावली आहे. वयवर्षे 100 ते 104 गटांतील स्पर्धकांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत मन कौर यांना सुवर्णपदक मिळाले. या धावण्याच्या स्पर्धेत करिअर करण्यासाठी या आजीबाईंनी वयाच्या 93 व्या वर्षी सुरुवात केली होती. विशेष म्हणजे, यासाठी आजीबाईंना त्यांच्या 78 वर्षीय मुलाकडूनच प्रेरणा मिळाली. गुरुदेव असे या मुलाचे नाव असून त्यांनीही वर्ल्ड मास्टर्स स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धेला जेष्ठ नागरिकांची ऑलिंपिक स्पर्धा मानले जाते. हिस्ट्री 18 टेलिव्हीजनने या आजीबाईंचा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे.
आजीबाईंनी जेव्हा सर्वात पहिल्यांदा या स्पर्धेत सहभाग घेतला होता, त्यावेळी त्यांनी एक मिनिट आणि 01 सेकंदात 100 मिटरचे अंतर पार केलं होतं. विशेष म्हणजे, मन कौर यांना कुठलाही शारिरीक त्रास नसल्याचे त्यांचे पुत्र गुरू देव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कौर यांच्या या कामगिरीचे सोशल मीडियावरुन भरभरुन कौतूक केले जात आहे. फिटनेस ब्रँड अभिनेता मिलिंद सोमणनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मन कौर यांचा फोटो शेअर केला आहे. तर ट्विटर युजर्संकडूनही आजीबाईंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.