नवी दिल्ली : अनुभवी देवेंद्र झांझरिया आणि विद्यमान जागतिक विजेता संदीप चौधरी यांच्यासह भारताचा १२ सदस्यांचा एक चमू बुधवारी पॅरालिम्पिकसाठी टोकियोला रवाना झाला. यामध्ये उंच उडी खेळाडू निषाद कुमार आणि रामपाल यांच्यासह थाळीफेक खेळाडू योगेश कथुनिया यांचाही समावेश होता.
झांझरिया विक्रमी तिसऱ्या सुवर्ण पदकासाठी प्रयत्न करणार असून यावेळी त्याला भारताच्याच अजित सिंग आणि सुंदर गुर्जर यांच्याकडून कडवी झुंज मिळू शकते. नशिबाची साथ मिळाल्यास भालाफेकमधील तिन्ही पदके भारताच्या नावावर होण्याची शक्यता आहे.
पॅरालिम्पिकमध्ये भारताची निराशाजनक सुरुवातभारताचे टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेल आणि सोनलबेन पटेल यांना पॅरालिम्पिक स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. महिलांच्या क्लास ३ गटात सहभागी झालेल्या सोनलबेनने पहिल्या तीन गेमपर्यंत आघाडी राखली होती, मात्र यानंतर तिला खेळात सातत्य राखता आले नाही.
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या चीनच्या ली कुआनविरुद्ध सोनलबेनचा २-३ असा पराभव झाला. कुआनने रिओ पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. पाच गेमपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात सोनलबेनचा ११-९, ३-११, १७-१५, ७-११, ४-११ असा पराभव झाला. त्याच वेळी, अन्य लढतीत भाविनाबेन हिचाही चिनी खेळाडूविरुद्ध पराभव झाला. क्लास ४ गटात सहभागी झालेल्या भाविनाबेनचा जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या झोउ युंगविरुद्धच्या एकतर्फी सामन्यात ३-११, ९-११, २-११ असा पराभव झाला.
ज्या खेळाडूंच्या शरीराचा वरील भाग नियंत्रित नसतो, मात्र हातांची हालचाल बऱ्यापैकी करता येते, अशा खेळाडूंचा क्लास ३ मध्ये समावेश असतो. तसेच, जे व्हीलचेअरवर बसून हातांची हालचाल करू शकतात, अशा खेळाडूंचा क्लास ४ मध्ये समावेश असतो.