नवी दिल्ली : आयपीएल स्पर्धेच्या आठव्या सत्रात केकेआर संघाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागलेले दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाच्या प्रशिक्षक गटाचे सदस्य प्रवीण आमरे यांनी विजयासाठी आणखी २० धावा आवश्यक असल्याचे म्हटले आहे. विजयाबद्दल आमरे यांनी केकेआर संघाच्या गोलंदाजांचेही भरभरून कौतुक केले आहे.पराभवानंतर आमरे म्हणाले, ‘‘विजयाचे श्रेय केकेआरच्या गोलंदाजांनाच द्यावे लागणार आहे. आमचा संघ पॉवर प्लेमध्ये केवळ ३४ धावांच करू शकला. उमेश यादवने शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे आमच्या संघाच्या कमी धावा झाल्या. आमच्या संघाने किमान २० धावा कमी केल्या. दिल्ली येथील मैदानाची स्थिती पाहता १७० पेक्षा अधिक धावा आव्हानासाठी चांगल्याच राहिल्या असत्या. मात्र इतक्या धावा करण्यात संघाला अपयशच आले. दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर आयपीएल स्पर्धेत लागोपाठ नवव्या पराभवानंतरही संघ आगामी काळात जोरदार कामगिरी करेल, असा दांडगा आत्मविश्वासही आमरे यांनी व्यक्त केला आहे. आमच्या संघाला अजून तीन सामने खेळायचे आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्धची लढत आमच्या संघासाठी महत्त्वपूर्ण आहे. जखमी जहीर खानबाबत बोलताना, त्याच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा होत आहे. आज त्याने सरावदेखील केल्याचे आमरे यांनी सांगितले. आगामी सामन्यात तो खेळू शकतो, असा विश्वासही आमरे यांनी व्यक्त केला आहे.(वृत्तसंस्था)
विजयासाठी २० धावा कमी पडल्या : आमरे
By admin | Published: April 22, 2015 3:03 AM