बालेवाडी संकुलात रनिंग ट्रॅकवर वाहने नेल्याप्रकरणी प्रशासनाची दिलगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 05:26 AM2021-06-28T05:26:51+5:302021-06-28T05:27:09+5:30
क्रीडामंत्र्यांकडून दखल : वाहनांना प्रवेश न देण्याचे आदेश
पुणे : बालेवाडी-म्हाळुंगे येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलातील समारंभादरम्यान आंतरराष्ट्रीय सिंथेटिक रनिंग ट्रॅकवर शनिवारी वाहने नेल्याप्रकरणी क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि क्रीडा संकुल प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.
नियोजित क्रीडा विद्यापीठासाठी या संकुलाची पाहणी आणि आढावा बैठक घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांचा लवाजमा उपस्थित झाला होता. या मंडळींच्या वाहनांनी सर्व नियमांचे उल्लंघन करून रनिंग ट्रॅकवर वाहने नेली. याप्रकरणी धावपटू, क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. रनिंग ट्रॅकवर कसे वावरावे याचे मूलभूत ज्ञान नसलेली ही मंडळी ‘क्रीडा विद्यापीठ‘ काय काढणार, असा संताप धावपटूंकडून व्यक्त होत आहे. याप्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दखल घेत यापुढे रनिंग ट्रॅकवर वाहनांना प्रवेश न देण्याचे आदेश दिले. शरद पवार यांच्या पायाला त्रास होत असल्याने एकाच वाहनाला काँक्रीटवरून जाण्यास परवानगी दिली होती. मात्र, त्याच वेळी काही वाहने थेट रनिंग ट्रॅकवर आल्याची घटना घडली. या प्रकरणी क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनीही लेखी खुलासा केला आहे.
बालेवाडी क्रीडा संकुल येथील रनिंग ट्रॅकवर कालच्या कार्यक्रमावेळी गाड्या लावण्यात आल्या. ही चूक भविष्यात होणार नाही यासाठी आम्ही काळजी घेत आहोत. आम्ही त्या ठिकाणी व्हीआयपी गाड्यांना परवानगी दिली होती. परंतु, त्या गाड्या नेमक्या कुठे लावायच्या? कशा पद्धतीने लावायच्या? याबाबतीत सूचना देण्यास कमी पडलो. ही आमच्या नियोजनातील मोठी चूक आहे. - ओमप्रकाश बकोरिया, क्रीडा आयुक्त