अमरहिंद शालेय कबड्डी: शारदाश्रमवर गौरीदत्त संघाचा निसटता विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 08:16 PM2019-02-01T20:16:33+5:302019-02-01T20:17:35+5:30
आयईएस नाबर गुरुजी हायस्कूलने साहिल टिकेकरच्या अष्टपैलू खेळामुळे सोशल सर्व्हिस लीग स्कूलचे आव्हान २२-१४ असे संपुष्टात आणले.
मुंबई : शारदाश्रम विद्यामंदिर तांत्रिक शाळेकडे पहिल्या डावात २ गुणांची आघाडी असतांना देखील प्रतिस्पर्धी गौरीदत्त मित्तल हायस्कूलने उत्तरार्धात ४०-३८ असे चकविले आणि अमर हिंद मंडळ- दादर आयोजित आंतर शालेय मुलांच्या कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत गौरीदत्त मित्तल हायस्कूलने प्रवेश केला. गौरीदत्तचा निखील शर्मा विरुद्ध शारदाश्रमचा शुभम यादव यांच्या चढाईमधील जुगलबंदीने सामना रंगला. अन्य सामन्यात आयईएस नाबर गुरुजी हायस्कूल, डॉ. अँटोनियो डासिल्वा टेक्निकल हायस्कूल, आनश एज्युकेशन स्कूल, शारदाश्रम विद्यामंदिर मराठी शाळा, राजा शिवाजी विद्यालय आदी शालेय संघानी विजयी आगेकूच केली.
दादर-पश्चिम येथील अमरहिंद क्रीडांगणामधील दुसऱ्या कबड्डी सामन्यात आयईएस नाबर गुरुजी हायस्कूलने साहिल टिकेकरच्या अष्टपैलू खेळामुळे सोशल सर्व्हिस लीग स्कूलचे आव्हान २२-१४ असे संपुष्टात आणले. उशिरा सूर सापडलेल्या अभिजित नेमणने प्रतिस्पर्ध्यांपेक्षा दुसऱ्या डावात अधिक दोन गुण मिळविण्यात महत्वाची कामगिरी करूनही सोशल सर्व्हिसला मध्यंतराची ३-१३ अशी १० गुणांची पिछाडी भारी पडली. डॉ. अँटोतोनियो डासिल्वा टेक्निकल हायस्कूलने साहिल सारंगच्या अप्रतिम खेळामुळे श्री हशू अडवाणी हायस्कूलचा ४६-३२ असा पराभव केला. अडवाणी हायस्कूलचा अष्टपैलू कुंज पटेलची लढत एकाकी ठरली.
आनश एज्युकेशन स्कूलने मध्यंतराला घेतलेल्या ८ गुणांच्या आघाडीमुळे शारदाश्रम विद्यामंदिर इंग्रजी माध्यमिक शाळेला ३७-३६ अशा फक्त एका गुणाच्या फरकाने पराभूत केले. आनशतर्फे रोहितने तर शारदाश्रम तर्फे सुजल देशमुखने चढाईत चमक दाखविली. शारदाश्रम विद्यामंदिर मराठी शाळेने चढाईपटू कल्पेश भोसलेच्या खेळामुळे बालमोहन विद्यामंदिरचा ३५-१८ असा; मारवाडी विद्यालयाने चढाईपटू मोहित शर्माच्या खेळामुळे श्री गणेश विद्यालयचा ५१-२४ असा तर राजा शिवाजी विद्यालयाने चढाईपटू यश बागलच्या खेळामुळे पीपल्स एज्युकेशन हायस्कूलचा ३७-२१ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.