अमरहिंद शालेय खोखो : महात्मा गांधी विद्यामंदिरला दुहेरी विजेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 08:59 PM2019-01-31T20:59:52+5:302019-01-31T21:01:23+5:30
महात्मा संघाच्या मुलींनी सेंट इझाबेल स्कूलचा एक डाव व ६ गुणांनी धुव्वा उडविला.
मुंबई : अमर हिंद मंडळ-दादरतर्फे वर्धापन दिनानिमित्त आयोजित आंतर शालेय खोखो स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिरने मुलांचे व मुलींचे असे दुहेरी विजेतेपद पटकाविताना प्रतिस्पर्ध्यावर निर्विवाद वर्चस्व राखले. अंतिम सामन्यात महात्मा गांधी विद्यामंदिरच्या मुलांनी डॉ. शिरोडकर हायस्कूलचा एक डाव व ४ गुणांनी तर महात्माच्या मुलींनी सेंट इझाबेल स्कूलचा एक डाव व ६ गुणांनी धुव्वा उडविला. महात्मा गांधी विद्यामंदिरच्या अद्वितीय कामगिरीत धीरज भावे, गणेश हेगरे, रामचंद्र हेगरे, अर्जुन अनिवसे आणि काजल गायकवाड, मुस्कान नाईक, साक्षी वाकेळकर, सिद्धी हिंदळेकर यांचा खेळ प्रमुख ठरला.
दादर-पश्चिम येथील अमर हिंद मंडळाच्या क्रीडांगणावर मुलांच्या निर्णायक सामन्यात महात्मा गांधी विद्यामंदिरच्या धीरज भावे (३.१० मि. व २ गडी), गणेश हेगरे (नाबाद १.५०, १.५० मि. व २ गडी), रामचंद्र हेगरे (२.२०, ३.४० मि. व १ गडी) व अर्जुन अनिवसे (१.४० मि. व ३ गडी) यांचा अष्टपैलू खेळ थोपविताना डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या खेळाडूंची आक्रमणात व संरक्षणात पुरती दमछाक झाली. परिणामी महात्मा गांधी विद्यामंदिरने एक डाव राखून ९-५ असा शानदार विजय संपादन केला. अंतिम उपविजेत्या डॉ. शिरोडकरच्या प्रतिक घाणेकर (१.५० मि.) व निखील पाडावे (१.५० मि.) यांनी पळतीचा छान खेळ केला.
मुलीच्या अंतिम सामन्यात महात्मा गांधी विद्या मंदिरच्या काजल गायकवाडचा दमदार ५.५० मिनिटे पळतीचा खेळ, साक्षी वाकेळकरच्या झंझावाती आक्रमणात गारद झालेले ४ गडी आणि मुस्कान नाईक (नाबाद १.५०, २.१० मि. व २ गडी) व सिद्धी हिंदळेकर (नाबाद २.३० मि. व १ गडी) यांचा अष्टपैलू खेळ यामुळे सेट इझाबेल स्कूलच्या मुलींना प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पेलवले नाही. त्यामुळे महात्मा गांधी विद्या मंदिरने एक डाव राखून ९-३ असा मोठा विजय प्राप्त केला आणि विजेतेपदासह दुहेरी मुकुट पटकाविला. अंतिम उपविजेत्या सेंट इझाबेलच्या आर्या तावडे (२.२० मि. व १ गडी) व श्रावणी पवार (१.३० मि.) यांनी छान खेळ केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ क्रीडाप्रेमी डॉ. विकास राजाध्यक्ष, अमरहिंद मंडळाचे कार्याध्यक्ष अरुण देशपांडे, सेक्रेटरी दीपक पडते, प्रफुल पाटील, संजय पेडणेकर, विजय राणे आदी मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला.