अमरावती : केंद्र शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत ९ ते १२ जानेवारी दरम्यान गुवाहाटी (आसाम) येथे आयोजित तिसऱ्या खेलो इंडिया युवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता अमरावती जिल्ह्यातील तब्बल १२ खेळांडूची निवड झाली आहे. या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण २० खेळ प्रकारांचा समावेश आहे. जिल्ह्यातुन धुनर्विद्या (आर्चरी) खेळात कोमल डवरे, मधुरा धामणगावकर, राघव पांडे, साक्षी तोटे, शुक्रमणी बाबरेकर, वैदेही राठोड, वेदांत वानखडे, तर जिम्नॅस्टिक्ससाठी वेदांती डांगे, खो-खो या खेळासाठी वैष्णवी ढोके, स्विमींगसाठी भक्ती काळमेघ, तर वेटलिफ्टींग खेळासाठी प्रीती देशमुख, पल्लवी पवार यांची निवड झाली आहे. १२ खेळाडू मुले-मुलींची खेलो इंडिया राष्ट्रीय युवा क्रीडा स्पर्धेकरिता क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणेमार्फत निवड करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील निवड झालेले खेळाडू खेलो इंडिया राष्ट्रीय युवा क्रीडा स्पर्धेत मेडल्स प्राप्त करतील, असा विश्र्वास अमरावती विभागाच्या उपसंचालक प्रतिभा देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी व्यक्त केला. तसेच सदर स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातील जे खेळाडू मेडल्स प्राप्त करतील, अशा खेळाडूंना खेलो इंडिया अंतर्गत तीन वर्षांपर्यंत दरमहिन्याला १० हजार एवढी स्कॉलरशिप देण्यात येणार आहे, असे गणेश जाधव म्हणाले.
खेलो इंडिया युवा राष्ट्रीय स्पर्धेत अमरावतीच्या १२ खेळाडूंची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 7:33 PM